म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे तरुणवर्ग ऑनलाइन गेमच्या आहारी जात असल्याचे चित्र असतानाच चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका खासगी बँकेच्या व्यवस्थापकास पाच लाख रुपयांचा फटका बसला. ऑनलाइन खेळून कमाईचे स्वप्न पाहणाऱ्या या व्यवस्थापकाची सायबरचोरांनी फसवणूक केली. या व्यवस्थापकाने केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.चेंबूरच्या टिळकनगर परिसरात राहणारे रोहन (बदललेले नाव) हे एका बँकेच्या वांद्रे कुर्ला संकुल येथील शाखेत व्यवस्थापक आहेत. इंटरनेटवर सर्च करीत असताना त्यांनी एक संकेतस्थळ पाहिले. यावर ऑनलाइन क्रिकेट, टेनिस, बास्केट बॉल यांसह अनेक खेळ ऑनलाइन खेळता येतात असे म्हटले होते. व्यवस्थापकाने या संकेतस्थळाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम खाते तपासले. त्यावर अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी संकेतस्थळाची जाहिरात केलेले व्हिडीओ दिसले. नामवंत अभिनेते, अभिनेत्री यांच्या जाहिराती असल्याने रोहन यांचा या संकेतस्थळावर विश्वास बसला आणि त्यांनी ऑनलाइन खेळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या संकेतस्थळावरील मोबाइल क्रमांकावर संपर्क केला असता समोरील प्रतिनिधीने पैसे जिंकल्यावर ते १५ मिनिटांत काढता येतात असेही सांगितले.२० हजार मिळाले, मात्र...रोहन यांनी पहिल्याच दिवशी कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या खात्यात ३० हजार रुपये वर्ग केले. ऑनलाइन खेळताना जिंकल्याने या ३० हजारांवर त्यांना बाराशे रुपये बोनस मिळाला. ही रक्कम त्यांच्या वॉलेटमध्ये दिसत होती. रोहन हे कंपनीच्या व्हॉटसअप समूहातही सहभागी झाले. त्यावर कंपनी सध्या रेटिंगवर अव्वल स्थानी असल्याने गुंतवणुकीवरही चांगला परतावा मिळत असल्याची चर्चा होती. रोहन यांनी स्वतःच्या बँक खात्यामध्ये आणखी पाच लाख रुपये गुंतविले आणि ऑनलाइन खेळणे सुरूच ठेवले. शहानिशा करण्यासाठी रोहन यांनी २० हजार रुपये काढण्यासाठी प्रक्रिया केली. ही रक्कम बँक खात्यामध्ये आल्याने त्यांचा विश्वास बसला. पाच लाखांवरही बोनस मिळत गेला, मात्र ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती. कालांतराने या कंपनीचे प्रतिनिधीदेखील चालढकल करू लागले. ही फसवणूक असल्याचे लक्षात येताच त्यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5J2FVhK
No comments:
Post a Comment