मटा विशेष, मुंबई : वातावरणातील अतितीव्र झळा असह्य होत असल्याने पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलमध्ये गारवा कमी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर पश्चिम रेल्वेने लोकलमधील एसी यंत्रणेची क्षमता वाढवून गारवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.यंदाच्या उन्हाळ्यात अतितीव्र झळा लागत असल्याने प्रवाशांनी एसी लोकलला मोठा प्रतिसाद दिला आहे. मध्य रेल्वेच्या तुलनेत वाढीव फेऱ्या असल्याने अनेकांनी एसी लोकलसाठी थांबून प्रवास करणे पसंत केले. यामुळे एप्रिल-मे महिन्यातील रोजची प्रवासीसंख्या सरासरी ९१ हजारांपर्यंत पोहोचली आहे.पश्चिम रेल्वेवर सहा एसी रेल्वेगाड्यांच्या ७९ फेऱ्या धावतात. गाड्यांमधील डब्यातील एसीची क्षमता १५ टन इतकी आहे. एसीचे तापमान २३ ते २५ अंश सेल्सियस कायम असते. डब्यांची प्रवासी क्षमता ३५० असून गर्दीच्या वेळी ५०० किंवा त्याहून अधिक प्रवासी असतात. परिणामी गारव्याबाबत तक्रारी प्राप्त होतात. यावर उपाय म्हणून मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एमयूटीपी प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या २३८ वंदे मेट्रो लोकलमधील डब्यांतील एसी यंत्रणेची क्षमता १७ टन ठेवण्यात येणार आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकलमधील छतावरील एसी यंत्रणा भेल कंपनीकडून पुरविण्यात येत आहे. सध्याच्या एसी लोकलमधील तक्रारी सोडवण्यासाठी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तसेच अन्य अनुभवी रेल्वे कर्मचाऱ्यांची रेल्वे स्थानकांवर नियुक्ती करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहे. एसी लोकलमधील छतातून पाणी ठिबकण्याच्या तक्रारी प्रवाशांनी नोंदवल्या होत्या. रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने मध्यस्थी केल्यानंतर तक्रारीचा निपटारा करण्यात आला होता. सोमवारी विरार-चर्चगेट लोकलमध्ये एसी लोकलमधील गारवा कमी होत असल्याच्या तक्रारी मिरारोड स्थानकात प्राप्त झाल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने डब्यातील एसी यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करून एसी पुन्हा सुरू करण्यात आला. गर्दीमुळे दरवाजे बंद होण्यास अडचणी येत असल्याने त्याचा परिणाम सेंसरवर कार्यान्वित एसी यंत्रणेवर झाला. परिणामी सोमवारी संध्याकाळी धावणाऱ्या एसी लोकल विनावातानुकूलित लोकल म्हणून चालवल्या गेल्या. आज, मंगळवारी सर्व एसी लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहेत, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oPXckT6
No comments:
Post a Comment