म. टा. प्रतिनिधी, ठाणे: आशियातील सर्वांत मोठ्या समूह विकास अर्थात क्लस्टर योजनेचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल दहा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. १५०० हेक्टरवर ही महत्त्वाकांक्षी योजना आकारास येणार आहे. त्यामुळे अनधिकृत व अधिकृत असलेल्या धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना भविष्यात स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित व संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यातील अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. १२मधील नागरी पुनरुत्थान योजना क्र. १ व २च्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. 'क्लस्टर योजना मलाही स्वप्नवत वाटत होती. अनधिकृत इमारतीसाठी कोणतीही योजना नव्हती. आम्ही आंदोलने केली, रस्त्यावर उतरून लढा दिला, मोर्चा काढला. या योजनेकरिता २०१४मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण काम करून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला', असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेच्या शुभारंभानंतर नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.नागरी पुनरुत्थान १ व २ची अंमलबजावणी सिडको प्राधिकरणामार्फत होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, आमदार रवींद्र फाटक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कुमार केतकर, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, ठाणे पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. दरम्यान, समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
'घराची चावी सुपूर्त करणे हाच आनंदाचा दिवस'
क्लस्टर योजनेचा शुभारंभ करणे हा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा व समाधानाचा क्षण आहे. मात्र या योजनेतील रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घराची चावी सुपूर्त करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंदाचा दिवस असेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित, विरोधकांचीही पाठ
नागपूर येथील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यांनी या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत, असेही शिंदे यांनी नमूद केले. तसेच या सोहळ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी पाठ फिरवली.'अडीच वर्षांच्या सरकारने दहा वर्षे मागे नेले'
'आमचे सरकार आल्यानंतर सर्व प्रकल्पांना चालना मिळाली. अडीच वर्षांच्या सरकारने दहा वर्षे मागे नेले' असा हल्लाबोल शिंदे यांनी मविआ सरकारचे नाव न घेता केला.पावसाळ्यानंतर इतर शहरांमध्ये क्लस्टर
मिरा भाईंदरलाही पावसाळ्यानंतर क्लस्टर योजना सुरू होईल. यासोबतच कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी येथेही ही योजना राबवणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबईतही जे पुर्नविकास प्रकल्प रखडले आहेत, ते सिडको, म्हाडा, मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rkaW1vd
No comments:
Post a Comment