म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : खुटवडनगरमधील महिलेला टेलिग्रामवरून वर्क फ्रॉम होमचे टास्क देऊन तिच्याकडून तब्बल १८ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. संबंधित महिलेला प्रश्नावली देऊन व वारंवार बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. सायबर पोलिस स्टेशनमध्ये २४ बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.खुटवडनगरमधील एका ३२ वर्षीय महिलेने फसवणुकीची फिर्याद दिली आहे. ही महिला मोबाइलवर सर्फिंग करीत होती. ‘वर्क फ्रॉम होम करा आणि काही दिवसांत लाखो रुपये कमवा’ अशी ऑफर त्यामध्ये दिसली. पैसे कमावण्याच्या उद्देशाने पूनम यांनी मार्चमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ची ऑफर स्वीकारली. यासाठी त्यांना पाठविलेल्या लिंकवर तांत्रिक पूर्तता केली. त्यानंतर त्यांना एका बँक खात्यावर ऑनलाइन पैसे भरण्यास सांगून काही प्रश्न पाठविण्यात आले. ही प्रश्नावली भरत असताना त्यांच्या मोबाइल लिंकिंग असलेल्या टेलिग्रामच्या खात्यात रिव्ह्यू पूर्ण केल्याचे गुण दाखवून मोबदल्यात रक्कम क्रेडिट होत असल्याचे दाखविण्यात आले.
२४ बँक खात्यांवर पैसे केले जमा
खात्यात पैसे जमा होत असल्याची खात्री पटल्याने पूनम यांनी महिनाभर रिव्ह्यू पूर्ण करण्यासाठी संशयितांनी सांगितल्यानुसार ३ ते २७ मार्च या कालावधीत विविध २४ बँक खात्यांवर एकूण १८ लाख १८ हजारांची रक्कम भरली. त्यामुळे त्यांना संबंधित संशयितांकडून डझनभर प्रश्न पाठविण्यात आले. पूनम यांनी प्रश्नांची उत्तरे दिली असता रिव्ह्यू पूर्ण होण्यासाठी लागणारा शेवटचा प्रश्न गहाळ केला जात असे. त्यामुळे रिव्ह्यू पूर्ण झाले नाहीत. संबंधितांनी नवीन प्रश्नावली टाकत त्या त्या प्रश्नांची रक्कम ठरवून दिली होती. मात्र, टास्क पूर्ण होताच पुन्हा जास्तीची रक्कम दाखवून प्रश्न पाठविले गेले. प्रश्न सोडविल्यानंतर त्याचा मोबदला रोख स्वरूपात क्रेडिट होत असल्याचे दाखविल्याने त्यांचा विश्वास वाढत गेला.संशयित खात्यांची होणार चौकशी
संशयितांकडून सांगितली जाणारी रक्कम पूनम भरत गेल्या. मात्र, त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कमच जमा झाल्याचे दिसत नसल्याने पूनम यांना संशय आला. पैसे का जमा झाले नाहीत, याचा शोध त्या घेऊ लागल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सायबर पोलिसांनी येस बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफबी बँकेतील संशयित खातेदारांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र मगर तपास करीत आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8DQsGF9
No comments:
Post a Comment