जकार्ता : भारताच्या पी. व्ही. सिंधूचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्थेतील अपयशाचा फेरा इंडोनेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेतही कायम राहिला. तिला पारंपरिक प्रतिस्पर्धी ताइ झू यिंगविरुद्धच्या लढतीत दुसऱ्या फेरीतच हार पत्करावी लागली. दरम्यान, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांनी पुरुष एकेरीत, तर चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी यांनी पुरुष दुहेरीतील भारताचे आव्हान कायम राखले.इंडोनेशिया ओपन ही या वर्षातील तिसरी सुपर १००० स्पर्धा. ऑलिम्पिक पात्रतेचा कालावधी मेपासून सुरू झाल्यापासूनची सलग ही पाचवी स्पर्धा. यात प्रणॉयचे यश वगळता भारतास काहीही साध्य झालेले नाही. त्यातील सिंधूचे अपयश चिंताजनक आहे. पुरुष एकेरीत श्रीकांतने त्याचा अनुभव पुन्हा एकदा पणास लावून लक्ष्य सेनविरुद्धची यशोमालिका कायम ठेवली. या लढतीत श्रीकांतने ४५ मिनिटांत २१-१७, २२-२० असा विजय मिळवला. सातव्या मानांकित प्रणॉयने हाँगकाँगच्या न्ग का लाँग अँगसचा २१-१८, २१-१६ असा ४३ मिनिटांत पराभव केला. सिंधूने यिंगविरुद्धची लढत १८-२१, १६-२१ अशी ३९ मिनिटांत गमावली. चिराग-सात्त्विकने हे जि तिंग-झोउ हाओ डाँग यांना २१-१७, २१-१५ असे पराभूत केले. प्रियांशू राजवतने अँथनी गिनतिंगला चांगली लढत दिली; पण तो अखेर २२-२०, १५-२१, १५-२१ असा पराभूत झाला.महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सिंधूने दोन्ही गेममध्ये चांगली लढत दिल्याचे चित्र निर्माण होते. प्रत्यक्षात तिने क्वचितच आव्हान निर्माण केले. यिंगने सुरुवातीपासून घेतलेले वर्चस्व कधीही गमावले नाही. यिंगने रॅकेटची दिशा ऐन वेळी बदलून सिंधूचा गोंधळ वाढवला. तिला शटलचा योग्य अंदाजच येत नव्हता. बेसलाइन; तसेच साईडलाइनबाबतही तिला नेमकी कल्पना नव्हती. यिंगचा खेळ पूर्ण बहरला नाही. तिच्याकडून काही चुका झाल्या. तेव्हाच सिंधूला गुण जिंकता आले. निराशाजनक कामगिरीमुळे सिंधूची १४व्या क्रमांकावर घसरण झाली असून, यिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघींमधील २४ लढतींतील १९ लढती यिंगने जिंकल्या आहेत.पुरुष एकेरीत श्रीकांत-लक्ष्य लढतीचा निर्णय दोन गेममध्येच झाला; पण कडवी चुरस होती. श्रीकांतचे प्रभावी टच तर लक्ष्यच्या वेगवान हालचाली यातील ही चुरस होती. श्रीकांतने नेटजवळ वर्चस्व राखून लढत जिंकली. त्याने लढतीत निर्णायक ठरणारे गुणही जिंकले. पहिल्या गेममध्ये १७-१७ बरोबरीनंतर श्रीकांतने केलेले आक्रमण प्रभावी होते. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने १३-१३ बरोबरीनंतर २०-१४ आघाडी घेतली. मात्र, लक्ष्यने सहा गुण घेऊन बरोबरी साधली. श्रीकांतने याच वेळी खेळ उंचावून यश मिळवले. श्रीकांतसमोर आता चीनच्या लि शी पेंगचे आव्हान असेल.गतवर्षी प्रणॉयने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना लक्ष्य सेन, अँगस, रासमुस गेमके यांना पराभूत केले होते. या वेळीही त्याने अँगसला फारशी संधी दिली नाही. त्याने या स्पर्धेत चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावताना प्रणॉयने गतीत केलेले बदल प्रभावी होते. तसेच त्याने पंच आणि स्मॅशचा हुशारीने वापर केला. प्रणॉय आज कोदाई नाराओका याला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. प्रणॉयने दोघातील यापूर्वीच्या चारही लढती गमावल्या आहेत. गेल्या दोन स्पर्धात पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागलेल्या चिराग-सात्त्विकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या असलेल्या भारतीय जोडीने प्रतिस्पर्ध्यांना फारशी संधी दिली नाही. भारतीय जोडीसमोर आता इंडोनेशियाच्या अव्वल जोडीचे आव्हान असेल. दोघांतील तीनपैकी दोन सामने भारतीय जोडीने गमावले आहेत; पण प्रतिस्पर्धी २०१९ नंतर प्रथमच एकमेकांसमोर आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rqkDYjI
No comments:
Post a Comment