Breaking

Saturday, June 3, 2023

गद्दारीला वर्ष होईल,'पन्नास खोके एकदम ओके ' विसरु नका, अजित पवारांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन डिवचलं https://ift.tt/2Jv0R1S

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर :‘राज्य सरकारविरुद्ध लोकांमध्ये असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. मात्र, ‘पन्नास खोके एकदम ओके तुम्हालाही विसरायचे नाही’, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना केले.राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने रेशीमबागेतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. ‘मंडल आयोगाच्यावेळी विरोध करणारे भाजप नेते आता मगरीचे अश्रू ढाळत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने डेटा चुकीचा असल्याचे जाणीवपूर्वक सांगितले. तुमचे मंडल तर, आमचे कमंडल ही घोषणा विसरू नका. त्यांना कोणतेच आरक्षण नको. समान नागरी कायद्याबाबतही नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा छुपा अजेंडा आहे,’ अशी तोफही पवार यांनी डागली.‘राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य झाले नाही. मंडलविरोधी ढोंगी नेत्यांचा बुरखा फाडण्याचे काम करा. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत,’ असा सवाल करून पवार म्हणाले, ‘गद्दारीला वर्ष होईल. निवडणुका घेण्यापासून त्यांना कुणी अडवले, काय होईल, ही धास्ती त्यांना वाटत आहे. विधान परिषदेत राज्यकर्त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.’‘आपले हिंदुत्व तुकाराम, नामदेव यांचे आहे, रेशीमबागेतील संघाचे नाही. शत्रू कोण, मित्र कोण हे ओबीसींना सांगायला हवे’, असे ज्येष्ठ विचारवंत हरी नरके म्हणाले. या वेळी ओबीसी सेलचे मावळते अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांचा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार अमोल मिटकरी, सक्षणा सलगर आदींची भाषणे झाली.

‘राऊतांनी तारतम्य ठेवून बोलावे’

ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर अजित पवार यांनी प्रतिहल्ला करण्याचे टाळले. ‘महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे. प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे. ते मोठे आणि महान नेते आहेत. त्यांच्या बोलण्याने अंगाला छिद्र पडत नाही’, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र राऊतांवर हल्ला चढवला. ‘खासदार संजय राऊत यांनी कुवत पाहून बोलावे. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांची माफी मागावी’, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.चंद्रपूर, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होतील. उमेदवाराबाबत योग्य तो निर्णय होईल. मात्र, महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी आपली लढाई सुरूच आहे, असं अजित पवार म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/73L58An

No comments:

Post a Comment