Breaking

Sunday, June 4, 2023

कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाबाबात गुड न्यूज! वनखात्याचा ग्रीन सिग्नल https://ift.tt/3E72UnC

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. कल्याण आणि बदलापूर दरम्यान दोन नव्या मार्गिका उभारण्याला वनखात्याने मंजुरी दिली आहे. यामुळे नव्या मार्गिका उभारणीतील मोठा अडथळा दूर झाला आहे.मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या 'एमयूटीपी ३ अ'मध्ये कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. १५ किमीच्या मार्गावर ४९ पूल, चार रेल्वे उड्डणपूल प्रस्तावित आहेत. नव्या मार्गिकांसाठी एक हजार ५१० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.नव्या मार्गिका उभारणीसाठी ०.२५२ हेक्टर जमीन वनखात्याच्या अखत्यारित आहे. वनजमीन संपादित करण्याचा प्रस्ताव नागपूरस्थित एकात्मिक क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवला होता. वनखात्याने संपूर्ण प्रकल्प उभारणीला पहिल्या टप्यातील मंजुरी दिल्याने जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.दहा गावांतील खासगी १०.४५ हेक्टर आणि सरकारी ३.१७ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. जमिनींचे मोजमाप आणि किंमत निश्चित करण्यात आली आहे. उल्हासनगर वगळता अन्य जागांचा अंतिम निवाडा पूर्ण झाला आहे. 'एमआरव्हीसी'कडून खासगी जागेच्या संपादनासाठी १३४.६४ कोटींचा निधी उल्हासनगरमधील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मार्गिकेदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ४९ पुलांपैकी ४४ पुलांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून २५ पुलांची कामे करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. लवकरच या पुलांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने पाच रेल्वे उड्डाणपुलांचा आराखडा मंजूर केला असून दोन रेल्वे उड्डाणपुलांचे काम करण्यासाठी सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. पाइपलाइन पुलाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मार्गिकेच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती 'एसआरव्हीसी'तील अधिकाऱ्यांनी दिली. अशा असतील मार्गिका- एमयूटीपी ३ अ - खर्च - ३३,६९० कोटी (मंजूर - २०१९ मार्च)- कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका - १,५१० कोटी रुपये- नव्या मार्गिकांचे रूळ - १५ किमी- १ मोठा आणि ४८ लहान पूल- ४ रेल्वे उड्डाणपूल२०२६ उजाडणार?मार्च २०१९मध्ये मंजूर झालेला नव्या मार्गिका चार वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर करोना आणि राज्य सरकारकडून एमआरव्हीसीला मिळणारा निधी बंद झाल्याने त्याचा परिणाम कल्याण-बदलापूर तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेवर झाला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निधी प्राप्त झाल्यावर एमयूटीपी ३ अ प्रकल्प संचातील प्रकल्प आकार घेण्यास सुरुवात झाली आहे. सध्याची स्थिती पाहता नव्या मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना २०२६पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.नव्या मार्गिकांमध्ये ७०० घरे बाधित होणार आहेत. या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन 'एमएमआरडीए'कडून करण्यात येणार आहे. हे पुनर्वसन झाल्यानंतर प्रकल्पाची निश्चित कालमर्यादा ठरवण्यात येणार आहे.- सुभाषचंद गुप्ता, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9D8QApf

No comments:

Post a Comment