नागपूर : मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या नागपुरातील तरुणाचा पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथील पेंच नदीत बुडून मृत्यू झाला. पियुष संजय रेणके ( वय १८ वर्षे), असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण नागपूरमधील उदयनगर रिंगरोड येथील भोलेबाबा नगरता राहात होता.मृत पियुषसह सात मुले पारशिवनी तालुक्यातील श्रीक्षेत्र घोगरा महादेव परिसरात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी आली होती. हे सर्व बारावीचे विद्यार्थी असून त्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे मित्राचा वाढदिवस आणि बारावी पास झाल्याची पार्टी साजरी करण्यासाठी ते सकाळी ६ वाजता नागपूरहून निघाले. ते सकाळी साडेसातच्या सुमारास पारशिवनी परिसरातील लिटिल गोवा म्हणून ओळख असणाऱ्या बाराई समाज तलाव परिसरात पोहोचले. या परिसराला भेट दिल्यानंतर ९.३० च्या सुमारास ते पेंच नदीपात्रातील श्रीक्षेत्र घोगरा महादेव परिसरात आले. येथे परिसराला भेट दिल्यानंतर ते मंदिर परिसरापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या चोखली डोहा येथे आले. पियुष आणि त्याचे दोन मित्र येथे अंघोळ करण्यासाठी पाण्यात शिरले.मात्र थोडाच वेळात तिघेही पाण्यात बुडत असल्याचे इतर मित्रांना दिसताच लगेच त्यांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र पियुष त्यांच्यापासून लांब असल्याने त्याच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही आणि तो पाण्यात बुडाला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. तहसीलदार हनुमंत जगताप, पोलीस ठाण्याचे अध्यक्ष राहुल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे यांच्यासह पोलीस व महसूल कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नाविकांचा मदतीने नदीत मृतदेह शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढता आला नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/otdshrV
No comments:
Post a Comment