म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीतच चार मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. १८ वर्षांच्या साबीर अन्सारी याने वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमवलेले दहा हजार रुपये परत मिळतील, या आशेवर मित्रांना खर्चासाठी दिले. मात्र मित्रांनी पैसे परत न देता पैसे मागणाऱ्या साबीरचीच हत्या केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात साबीर आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. ३१ मे रोजी वाढदिवस असल्याने मित्रांना पार्टी देण्यासाठी त्याने १० हजार रुपये साठविले होते. मात्र याची कुणकुण त्याच्या चार मित्रांना लागली होती. वाढदिवसाआधीच त्यांनी साबीरला पार्टीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे वाढदिवसाआधीच संपतील म्हणून साबीर याने नकार दिला. तुझे पैसे वाढदिवसापूर्वी देतो, असे चौघांनी सांगितल्याने तो पार्टीसाठी तयार झाला. भिवंडी ढाबा, मुंब्रा आणि माहीममध्ये जाऊन सर्वांनी पार्टी केली. त्यानंतर काही दिवस गेल्यावर वाढदिवस आला तरी मित्र काही पैसे देत नव्हते. त्यांनी साबीरला धमकावले आणि हाकलून दिले. या चार मित्रांना न बोलवता साबीरने ३१ मे रोजी डीजे लावून पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान, साबीरची पार्टी सुरू असतानाच त्याचे चार मित्र पार्टीमध्ये आले. त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर चाकूने भोसकून त्याची हत्या केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VIsX3Aa
No comments:
Post a Comment