म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: श्रीरामाच्या नगरीतील, अयोध्येच्या राममंदिरातील श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सन २०२४च्या सुरुवातीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. सध्याच्या नियोजनानुसार पुढील वर्षी २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिराच्या प्रशस्त गाभाऱ्यात रामरायाच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे नियोजन आहे.अवघ्या रामभक्तांचे डोळे लागलेला क्षण नजीक आला आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त सात दिवस चालणाऱ्या विशेष कार्यक्रमानंतर राममंदिर भाविकांसाठी व पर्यटकांसाठी खुले होईल. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टने रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून त्याबाबतच्या तारखेबाबत अंतिम प्रतिसाद लवकरच अपेक्षित आहे.राममंदिर विश्वस्त संस्थेच्या नियोजनानुसार २२ जानेवारी, २०२४ रोजी म्हणजेच जानेवारीतील अखेरच्या सोमवारी प्रभू श्रीराम, सीतामाता यांच्या भव्य मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. रामजन्मभूमीवरील या ऐतिहासिक मंदिरातील रामलल्लाच्या दर्शनाने कोट्यवधी भाविकांची मनोकामना पूर्ती होणार आहे. सध्या अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभे राहणाऱ्या भव्य मंदिरातील गाभाऱ्याच्या वरच्या भागात बांधकाम सुरू आहे. तर गाभाऱ्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. ऑक्टोबरपर्यंत राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्ण होईल. प्रतिष्ठापनेनंतर २४ जानेवारी, २०२४ रोजी रामाच्या मूर्तीला पहिला महाअभिषेक केला जाईल. हा सोहळा सुमारे सात दिवस चालणार आहे. याबाबतच्या आमंत्रणाला पंतप्रधान कार्यालयाकडून कधीही प्रत्युत्तर मिळू शकते. त्यानंतर अंतिम तारखेची घोषणा केली जाईल. कोट्यवधी भाविकांची प्रतीक्षा संपणार असल्याने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास भक्तांची अभूतपूर्व गर्दी होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठीच्या व्यवस्थापनाबाबतही संपूर्ण तपशीलवार आराखडा तयार करण्यात आला आहे. - २२ जानेवारी, २०२४ रोजी प्रभू श्रीराम, सीतामातेच्या भव्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठा- सध्या भव्य मंदिरातील गाभाऱ्याच्या वरच्या भागात बांधकाम सुरू- गाभाऱ्याचे काम पूर्ण; ऑक्टोबरपर्यंत पहिल्या मजल्याचे काम पूर्ण होणार- प्रतिष्ठापनेनंतर श्रीरामाच्या मूर्तीला पहिला महाअभिषेक
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/06rdNjy
No comments:
Post a Comment