नाशिक : दुहेरी खुनातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर समर्थकांसह वाहनांच्या ताफ्यातून घरी येताना विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सातपूरमधील भूषण लोंढे याच्यासह अकरा संशयितांवर ही कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.न्यायालयीन निकालापूर्वीदेखील पोलिसांनी त्यांना केलेल्या सूचनांचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा पुत्र व ‘पीएल ग्रुप’चा संस्थापक भूषण लोंढे आणि प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार, निखिल मधुकर निकुंभ, सनी ऊर्फ ललित अशोक विठ्ठलकर, किशोर गायकवाड, संदीप गांगुर्डे, आकाश मोहित, प्रकाश मोगल लोरा, विकी प्रकाश लोरा व समाधान जगताप (सर्व रा. स्वारबाबानगर, सातपूर, नाशिक) या संशयितांवर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहनांच्या ताफ्याद्वारे मिरवणूक काढून, फटाक्यांची आतिषबाजी करून या तथाकथित भाईचे स्वागत तर झालेच, शिवाय समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. न्यायालय आणि पोलिसांनीही जल्लोष न करण्याचे निर्देश भाईच्या पंटर लोकांनी वाहनांच्या टायरखालीच तुडविले. गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सातपूर‘भूषण’ ठरलेल्या भूषण भाईचे जेलमधून येथून थेट स्वारबाबानगरमध्ये भरपावसात स्वागत केले होते. अनेकांनी स्टेटस म्हणून मिरवणुकीचे व्हिडीओ ठेवले. विविध पोस्ट अनेक तरुणांनी, समर्थकांनी, तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अपलोड केल्या. त्यातून गुन्हा दाखल केल्याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZSHVw4r
No comments:
Post a Comment