म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाने सलग दोन दिवस मुंबईला झोडपल्यानंतर शुक्रवारी अखेर विश्रांती घेतली. सकाळच्या वेळी एखाद-दुसरी जोरदार सर मुंबईकरांनी तुरळक ठिकाणी अनुभवली, मात्र त्यानंतर मुंबईत पावसाचा जोर कमी झाला.कुलाबा येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत ६.८, तर सांताक्रूझ येथे १९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या तुलनेत सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ११९, तर कुलाबा येथे ११६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कुलाब्याच्या पावसाने ऑगस्टची सरासरी ओलांडली आहे. कुलाबा येथे २८ जुलैच्या सकाळी ८.३० पर्यंत १७३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत कुलाबा येथे १७१६ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो.शुक्रवारी दिवसभरात देवनार, जोगेश्वरी, भांडुप अशा तुरळक ठिकाणी ४० ते ५० मिलीमीटर दरम्यान पाऊस पडला. इतर केंद्रांवर २० ते ४० मिलीमीटर दरम्यान, तर मुंबई शहरामध्ये बहुतांश ठिकाणी २० मिलीमीटरहून कमी पावसाची नोंद झाली.कोकण विभागात अजूनही मान्सून सक्रीय असून १ ऑगस्टपर्यंत उत्तर आणि दक्षिण कोकण दोन्ही विभागांमध्ये बहुतांश सर्व ठिकाणी पाऊस असेल. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची व्यापकता येत्या चार दिवसांमध्ये कमी होईल. मराठवाड्यातही दोन दिवसांनंतर पावसाची व्यापकता कमी होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भामध्ये ३१ जुलैपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस असेल त्यानंतर व्यापकता कमी होईल. दरम्यान, उत्तर ओडिशा आणि बाजूच्या प्रदेशावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे तसेच हे क्षेत्र उत्तरेकडे सरकले आहे. यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HpkXhLD
No comments:
Post a Comment