Breaking

Saturday, July 29, 2023

नवी मुंबईकरांची पाणीचिंता मिटली, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात इतका जलसाठा https://ift.tt/GoEvDq4

नवी मुंबई : संपूर्ण नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या मोरबे धरणाचा जलसाठा वाढला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पातळीत वाढ होत असून सध्या धरणात ८८ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जून २०२४पर्यंत पुरेल इतका असल्याने नवी मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे.हवामान विभागाने कोकण किनारीपट्टीला मागील दोन दिवसांपासून ऑरेज अॅलर्ट देऊन मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. हे भाकीत खरे ठरवत मोरबे धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोरबे धरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. १८ जुलैपर्यंत मोरबे धरणात केवळ ४८ टक्के पाणीसाठा होता. मात्र, १९ जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मागील १० दिवसांमध्येच मोरबे धरणातील पाणीसाठा तब्बल ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा साठा जून २०२४पर्यंत पुरेल इतका असल्यामुळे नवी मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या आठवड्यात धरण भरण्याची शक्यता आहे. मोरबे धरणाची उंची ८८ मीटर असून आतापर्यंत ८५.६१ मीटरपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. धरणातून विसर्ग होण्यासाठी केवळ अडीच मीटर पाण्याची आवश्यकता आहे.नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण जुलै महिन्याच्या दुसरा आठवड्यापर्यंत निम्मे रिकामेच होते. त्यामळे या वर्षी पाणीकपात करावी लागते की काय, अशी चिंता पालिका प्रशासनाला होती. परंतु जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. १२ जुलैला मोरबेत अवघे ४२ टक्के पाणीसाठा होता. तर सद्यस्थितीत हा पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या आठवड्यात धरण भरण्याची शक्यता आहे. मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रतिदिन ४२० एमएलडी पाणी वापरले जाते. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केला जातो.मोरबे धरणाची पातळी ८८ मीटरला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. २५ जुलै २०१८ रोजी आणि ४ ऑगस्ट २०१९ रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. सन २०२०मध्ये पाऊस लांबल्याने ९५ टक्के धरण भरले होते. सन २०२१मध्येही सप्टेंबरच्या अखेरस धरण भरले होते. तर, सन २०२२मध्ये धरण काठोकाठ भरले होते. यंदा मात्र असाच पाऊस सुरू राहिल्यास आठवड्याभरात धरण भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OUqim5x

No comments:

Post a Comment