म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: विक्रोळी पार्कसाइट आणि वाहतूक पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीमध्ये भरधाव कारचालकाने पोलिस उपनिरीक्षकाला उडविल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेत उपनिरीक्षक विरेंद्र खवळे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना धडक देऊन पळालेला कारचालक विशाल घोरपडे याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले.वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आदेश आल्याने पार्कसाइट पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या वतीने कांजुरमार्ग पश्चिमेला हुमा मॉलचे समोर शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमाराम नाकाबंदी करण्यात आली होती. दोन वाजताच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने भांडूपच्या दिशेने जाताना पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिस कॉन्स्टेबल संदीप गायकवाड यांनी त्या गाडीला हाताने थांबण्याचा इशारा केला. परंतु त्या गाडीवरील चालकांने गाडीचा वेग वाढवून त्यांच्या अंगावर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते जीव वाचवून बाजूला झाले. त्याचवेळी उपनिरीक्षक विरेंद्र खवळे यांनी पुढे येऊन त्यास थांबविण्याचा इशारा केला असता त्या चालकाने भरधाव वेगाने त्यांच्या अंगावर गाडी घालून जोराने धडक देत गांधीनगर जंक्शनच्या दिशेने पळून गेला. जोरदार धडक बसल्याने खवळे दूरवर फेकले गेले आणि त्याच्या हाताचे हाड तुटले. गंभीर जखमी झालेल्या खवळे यांना तत्काळ वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आल्यानंतर या विभागातील सर्व पोलिसांनी या कारचा पाठलाग केला. भांडुप पोलिसांनी कार अडवून कारचालक विशाल घोरपडे याला ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत असल्याचा अंदाज आहे. पार्कसाइट पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/XIrbS01
No comments:
Post a Comment