मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका प्रवाशांसाठी खुली होईल, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. या उत्सवात प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-कोकण मार्गावर एसटीची नवी संपूर्ण शयनयान एसटी गाडी रातराणीच्या श्रेणीत चालवण्याचे नियोजन महामंडळाने सुरू केले आहे.एका मार्गावर गाड्या सुरू करताना दोन गाड्यांची आवश्यकता असते. एसटीच्या नव्या संपूर्ण शयनयान ५० गाड्यांपैकी एका गाडीची नोंदणी होऊन ती प्रवासीसेवेसाठी तयार आहे. दुसऱ्या गाडीची बांधणी अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वी कोकणातील कोणत्या स्थानक-आगारातून प्रवासी मागणी अधिक आहे, यासाठी विभाग नियंत्रकांना मार्ग सूचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.एसटी महामंडळाच्या दापोडी कार्यशाळेत रातराणी श्रेणीसाठी संपूर्ण शयनयान बस बांधण्यात येत आहे. ही बस विनावातानुकूलित आहे. दोन अधिक एक अशा ३० प्रवाशांसाठी आसनव्यवस्था शयनयान गाडीत आहे. प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र मोबाइल चार्जिंग सुविधा, पाण्याची बाटली, वृत्तपत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पा आणि पर्स अडकवण्यासाठी हूक अशा सुविधा आहेत. महामंडळाच्या ताफ्यात सध्या जुन्या चेसिसवर संपूर्ण शयनयान दोन बसगाड्या मुंबई-अक्कलकोट मार्गावर धावत आहेत. नव्या चेसिसवर बांधण्यात येणारी महामंडळातील पहिलीच गाडी कोकण मार्गावर धावणार आहे.एसटीची नवी शयनयान बस मुंबई-कोकण मार्गावर चालवण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे. नव्या बसमुळे गणेशोत्सवात राज्यातील एसटी प्रवाशांना दर्जेदार पर्याय माफक दरात उपलब्ध होणार आहे.- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HDztbkO
No comments:
Post a Comment