कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज परिसरात कॅफेमध्ये अंधार करून अश्लील चाळे करत बसलेल्या जोडप्यांना निर्भया पथकाने छापा टाकत ताब्यात घेतले आहे. या सोबतच शहरातील मिरजकर तिकटी, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथे ही छापेमारी करण्यात आली असून या पडलेल्या छाप्यामुळे आणि अचानक कॅफेमध्ये पोलीस आल्याने प्रेमीयुगलांची एकच भांबेरी उडाली होती. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील शाहू मैदान बस थांब्यावर ३ रोडरोमियोनी शालेय विद्यार्थिनींची छेड काढली होती. यानंतर संतप्त जमावाने रोडरोमियोची बेदम धुलाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यानंतर या तिन्ही रोडरोमियोवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कोल्हापुरात महिला, विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. दरम्यान या प्रकरणाची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गंभीर दखल घेत निर्भया पथकाला अशा रोडरोमियो आणि अवैधरित्या सुरू असलेल्या गोष्टींवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून शहरातील कॅफेची माहिती काढली असता काही कॅफेमध्ये गैरप्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार निर्भया पथकाने मिरजकर तिकटी, उमा टॉकीज चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर येथील कॅफेंवर आज छापेमारी केली. यावेळी कॉलेजच्या नावाखाली कॅफेमध्ये अंधाऱ्या खोलीत अश्लील चाळे करणाऱ्या चार जोडप्यांवर धडक कारवाई करत ताब्यात घेतले. यावेळी अचानक कॅफेमध्ये पोलीस आल्याने प्रेमीयुगुलांची भांबेरी उडालेली पाहायला मिळाली. तर या कारवाईमुळे कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई भविष्यात सुद्धा आम्ही अशीच सुरुच ठेवणार असून जे चुकीचे प्रकार कोल्हापुरात सुरू आहेत. त्यावर १०० टक्के निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच महाविद्यालयीन युवती, शाळकरी मुलींना रस्त्यात थांबवून त्यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या हुल्लडबाजांविरोधात युवती आणि पालकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9OlqgXh
No comments:
Post a Comment