कोल्हापूर: अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपवर थेट हल्लाबोल केल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कोल्हापुरातील मेळाव्याचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. यातून त्यांनी आगामी राजकीय दिशाच स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते कोल्हापुरातून त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना महाराजांच्या भूमिकेने आघाडीच्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. या सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भुषविणार आहेत. पवार आणि छत्रपती घराण्याचे अतिशय चांगले संबंध आहेत. महाराजांनी भाजपच्या वैचारिक भूमिकेवर एकदा नव्हे तर अनेकदा हल्ले चढवले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाच स्पष्ट झाली. याच पार्श्वभूमीवर त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेला उमेदवारी देण्यासाठी काही महिने प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या राजकीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला बळ दिले आहे.पवारांची ही सभा थेट राजकीय आहे. या सभेला महाराज उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीकडे या क्षणी लोकसभेसाठी सक्षम उमेदवार नाही. काग्रेसचे आमदार पी.एन. पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, राष्ट्रवदीचे माजी आमदार के.पी. पाटील, शिवसेनेचे संजय घाटगे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार अशी नावे पुढे केली जात आहेत. पण काहीजण इच्छूक नाहीत. काहींची ताकद कमी पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यास महाविकास आघाडीची उमेदवारी प्रबळ होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने सध्या खासदार संजय मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची नावे चर्चेत आहेत. महाराजांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घेतल्यास आघाडीला अतिशय प्रबळ उमेदवार मिळणार आहे. त्यांच्यामुळे सर्व गट एकत्रितपणे ताकद उभी करतील. शिवाय त्यांच्या विषयी जनमानसात अतिशय चांगली भावना असल्याने त्याचाही मोठा फायदा आघाडीला होणार आहे. यामुळे ते उमेदवार असावेत म्हणून पवारांनीच फिल्डींग लावली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्याचे समजते. यामुळे महाराज राष्ट्रवादीच्या जाहीर सभेला येणार आहेत. असे झाल्यास भाजपला मात्र तगडा उमेदवार मिळविण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. महाराजांनी महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आपल्या भूमिकेने दिले आहेत. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनाही बळ मिळणार आहे. लोकसभेसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती घराणे आणि पवारांच्या ते निकटचे असल्याने महाराज मैदानात नसतील तर त्यांच्या प्रचारात निश्चितपणे सहभागी होतील. ज्याचा लाभ महाविकास आघाडीला होणार आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा आघाडीतील ज्या पक्षाला मिळेल, त्या पक्षाच्या चिन्हावर महाराज लढण्याची शक्यता आहे. त्यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाबरोबर ही अतिशय चांगले संबंध आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी त्यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेला ही जागा मिळाली तर ते या पक्षाच्या वतीने ही लढू शकतील. सध्या तरी ही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षाला मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जागा कोणालाही मिळाली तरी सक्षम उमेदवार म्हणून महाराज यांनाच तीनही पक्ष उमेदवारी देऊ शकतात.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8wJdx0t
No comments:
Post a Comment