पुणे : कोंढवा परिसरातील इस्लामिक स्टेटचे (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूल दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त केले आहे. महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी एटीएसने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने महंमद युनूस महंमद याकू साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना पुण्यात आणल्याचे एटीएसच्या तपासात उघडकीस आले आहे. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) साकी आणि खान यांचा शोध घेत असताना बडोदावाला याने त्यांना पुण्यात आणून त्यांच्या मार्फत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इस्लामिक स्टेटच्या (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनान अली सरकार याला अटक केल्यानंतर एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांशी त्याचा संबंध असल्याची माहिती पुढे आली. एनआयएने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना ओढण्यात हा गट सक्रिय होता. या गटाचे पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांशी लागेबांधे उघड झाल्यानंतर एटीएसने पुण्यातील दाखल गुन्ह्यात बडोदावाला याला नुकतेच मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले आहे. बडोदावाला याने साकी आणि खान यांना पुण्यात आणून त्यांच्यामार्फत काही तरुणांसाठी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. बडोदावाला याच्या सांगण्यावरून अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याने साकी आणि खान यांना कोंढव्यात राहण्यासाठी खोली मिळवून दिली होती. साकी आणि खान हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असून, दीड वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास होते. घातपाताच्या गुन्ह्यातील अटक आरोपींकडून पुणे व इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि कार तसेच पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे असे साहित्य एटीएसने शनिवारी जप्त केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/G8e6xg0
No comments:
Post a Comment