सातारा : भारताच्या १७ वर्षीय अदिती स्वामीने शनिवारी जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. पण तिच्या या गोल्डन यशाचे रहस्य आहे तरी काय, हे तिच्या वडिलांनी आता सर्वांंना सांगितले आहे."अदितीने बर्लिन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. ती वर्ल्ड चॅम्पियन झाल्याबद्दल तिचा खूप खूप अभिमान वाटतोय. सातारा जिल्ह्यातील शेरेवाडी या छोट्याशा दुर्गम गावातून आलेल्या आदितीने जर्मनी देशातील बर्लिनसारख्या शहरांमध्ये जाऊन वर्ल्ड चॅम्पियनशिपपर्यंत मजल मारते ही सातारा जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. अदितीची सुरुवात ही मुळातच या खेळात झाली. ती एकदम बेसिक लेवलपासून झाली. कमी कालावधीमध्ये तिने ही यशापर्यंत मजल मारली आहे. तिने हे यश कष्टाच्या जोरावर संपादन केले आहे. एकाग्रता, जिद्द व चिकाटी या गुणांमुळेच ती पुढे जाऊ शकली. या यशामध्ये तिच्या आईचाही मोलाचा वाटा आहे. आईने तिला पूर्णपणे सहकार्य केलं. दैनंदिन डायट, समतोल आहार, प्रॅक्टिस या बाबीकडे त्यांनी वेळच्यावेळी चोखपणे लक्ष दिले," असे अदितीचे वडील गोपीचंद स्वामी यांनी सांगितले.आदिती हिने ज्युनिअर जगज्जेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आज बर्लिन मधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाउंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या एंड्रिया बेसिराला पराभूत करून विश्वविजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत मेक्सिकोच्या एंट्रिया हिचा आदितीने १४९-१४७ असा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. बेसिरा ही दोन वेळा जगजेता राहिली आहे. १७ वर्षीय आदिती स्वामी ही वैयक्तिक स्पर्धेत जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे. आदितीने उपांत्य फेरीत भारताच्या अनुभवी ज्योती वेन्नमचा १४९-१४५ असा पराभव केला होता. जून महिन्यात लिमेरिक (आयर्लंड) येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत विजेतेपद मिळवून सातारा जिल्ह्यातील शेरेवाडी येथील अदिती स्वामीने आता एक जगाच्या नकाशावर नवा इतिहास लिहिला आहे. त्यामुळे जगभरात भारतासह महाराष्ट्राचे नाव अदितीच्या कामगिरीमुळे उंचावले होते. तसेच एक महिन्यापूर्वी अदिती स्वामीने वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेत प्राथमिक फेरीत ७११ गुणांची कमाई करत १८ वर्षांखालील गटातील जागतिक विक्रम केला होता. तिने अमेरिकेच्या लीन ड्रेक हिला १४२-१३६ असे पराभूत केले. वैयक्तिक सुवर्णपदक पटकावल्या खूप आनंद झाला."अदिती ही बालपणापासून जिद्दी, मेहनती आहे. एकाग्रता, संयम हे तिचे खास गुणविशेष! त्यामुळेच ती नक्कीच यश कवेत घेणार, याची खात्री होती.अदितीने कष्ट घेऊन ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची शान वाढवावी," अशी इच्छा आई शैला स्वामी यांनी व्यक्त केली.अदितीने आतापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली खेळाची चुणूक दाखवून विविध पदकांना गवसणी घातली आहे. कोलंबिया, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, आयर्लंड येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने सांघिक गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहेत. अदितीच्या आजच्या यशानंतर देशासह साताऱ्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. साताऱ्यातील अनेक ज्येष्ठ क्रीडापटूंनी आदितीच्या या सुवर्ण यशाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने नुकतेच पहिल्यांदाच कंपाउंड तिरंदाजी स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. त्या पाठोपाठ अदिती स्वामीच्या यशामुळे देशाच्या पदक तक्त्याला सुवर्ण झळाळी मिळाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wABPQns
No comments:
Post a Comment