नांदेड: जेवण करण्यासाठी नांदेडहून अर्धापूर येथील धाब्यावर जात असलेल्या दोन मित्रावर नियतीने घात केला. ट्रक, स्कुटी आणि स्कॉर्पिओ या तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नांदेड-अर्धापूर मार्गावरील जामरून पाटीजवळ ही घटना घडली. घटनेनंतर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. युनूस खान आणि शहबाज खान असं मृत युवकांची नावे असून दोघेजण शहरातील खडकपूरा परिसरातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शहबाज खान (३३) आणि युनूस खान (२७)यांच्यासह इतर दोन असे चार जण शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन वाहनांवरुन अर्धापूरकडे जात होते. एका धाब्यावर पार्टी करण्याचा त्यांचा प्लॅन होता. अर्धापूरकडे जात असताना समोरून राजस्थान पासिंगचा ट्रक क्रमांक (आर.जे.१७ जी. ए.५५०२) ही नांदेडहुन अर्धापूरकडे जात होता. या ट्रकच्या पाठीमागे चौघे जण होते. तसेच त्यांच्या पाठीमागे स्कॉर्पिओ गाडी होती. तिन्ही वाहनांचा वेग जास्त होता. जामरून पाटीजवळ खड्डा असल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे स्कुटी आणि स्कॉर्पिओ ट्रकवर धडकली गेली. त्यामुळे स्कुटीवरील शहबाज खान आणि युनूस खान हे दोघेजण दोन्ही वाहनांच्या मधोमध आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अर्धापूर जाणाऱ्या मार्गावर बराच वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकांचे पार्थिव विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. नांदेड ते अर्धापूर जाणाऱ्या मार्गाचे काम संतगतीने सुरु आहे. यापूर्वी अनेक वेळा या मार्गावर अपघात घडले आहेत. दरम्यान आज घडलेली घटना काळजाला चटका लावणारी ठरली. एकाच परिसरातील दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/B8IpYeu
No comments:
Post a Comment