पुणे: पुण्यातील दौंडमध्ये विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाने शाळेतच तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पुण्याच्या दौंड जावजीबुवाचीवाडी परिसरातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत घडली आहे. आत्महत्या केलेल्या शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. अरविंद ज्ञानेश्वर देवकर (४६) रा. उरळीकांचन, तालुका. पुरंदर असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिक्षक अरविंद देवकर हे दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकतीच दोन महिन्यांपूर्वी बदलून आले होते. त्यांच्या वस्तीवरील शाळेत अवघे दहा विद्यार्थी होते. दरम्यान नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांनी काही कारणामुळे मुलांचा दाखला दुसऱ्या शाळेत घातला. यामुळे अरविंद खचले होते, अशी माहिती मिळते आहे. याच तणावात येऊन त्यांनी शाळेतच तणनाशक हे विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा ३ ऑगस्ट रोजी प्रयत्न केला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिक नाजूक झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांनी आत्महत्या करण्याचे ठोस असं कारण पुढे आलेलं नाही. तरी प्राथमिक कारण हे शाळेतील मुलांचा दाखला दुसऱ्या शाळेत घातल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8HrU3hx
No comments:
Post a Comment