मुंबई : काळोखी रात्र... खवळलेला समुद्र... घोंगावणारे वारे... अशा धोकादायक स्थितीतही तटरक्षक दलाच्या वैमानिकांनी हेलिकॉप्टर हवेत उडवले आणि हृदयविकाराचा झटका आलेल्या चिनी खलाशाचा खोल समुद्रात बचाव केला. बुधवार-गुरुवारच्या रात्री अरबी समुद्रात हा थरार घडला.चीनची ‘एमव्ही डोंग फँग कान तान’ ही संशोधन नौका चीनच्या मकन बंदरावरून ‘यूएई’कडे जात होती. अरबी समुद्रात मुंबईपासून २०० किमी अंतरावर असताना बुधवार, १६ ऑगस्टला दुपारी नौकेवरील एका खलाशाला हृदयविकाराचा झटका आला. नौकेने तत्काळ तटरक्षक दलाच्या वरळी येथील समुद्री बचाव समन्वय केंद्राकडे (एमआरसीसी) मदत मागितली. त्या वेळी तटरक्षक दलाची ‘आयसीजीएस सम्राट’ ही नौका त्याच परिसरात होती. या नौकेवर वैद्यकीय चमूदेखील होता. त्यानुसार ‘आयसीजीएस सम्राट’ला तिकडे धाडण्यात आले. नौकेतील चमूने प्राथमिक उपचार केले. मात्र, त्यानंतरही त्या खलाशाची प्रकृती खालावत होती. त्यामुळे तत्काळ हेलिकॉप्टर बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी रात्रीचे पावणे आठ वाजले होते. त्यानंतर खरा थरार सुरू झाला...अत्यवस्थ खलाशापासून तटरक्षक दलाचा जवळचा हवाईतळ दमण येथे होता. मात्र, दमण तळावरील मदतीसाठीचे ‘एएलएच ध्रुव’ हे हेलिकॉप्टरही त्या वेळी हवाईतळापासून ३५० किमी दूर होते. त्या वैमानिकांना तातडीने संदेश पोहोचविण्यात आला. त्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये इंधन कमी असल्याने हे वैमानिक दीड तासांचे उड्डाण करून आधी दमणला आले. रात्री साडेदहानंतर इंधन भरून संकटग्रस्त नौकेच्या दिशेने हवेत झेपावले. तेथे पोहोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. २०० किमी दूर खवळलेल्या खोल समुद्रात आणि खराब वातावरणात या वैमानिकांनी हेलिकॉप्टरवर उपलब्ध दिव्यांच्या साह्याने अंधारातच नौकेवरून दोरीने जाळी खाली सोडली व रात्री दीडच्या सुमारास चिनी खलाशाला ‘एअरलिफ्ट’ करून तातडीने दमणच्या दिशेने उड्डाण केले. हेलिकॉप्टर दमणला पोहोचले, त्या वेळी पहाटेचे २.५५ वाजले होते. त्यानंतर खलाशाला वापीच्या रुग्णालयात नेण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.तटरक्षक दलाचे ‘वसुधैव कुटुंबकम’भारत-चीनचे संबंध सध्या आगळ्या टप्प्यावर आहेत. चिनी नौकांचा अरबी समुद्रातील वावरही अनेकदा वादाचा विषय ठरला आहे. असे असतानाही तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर वैमानिकांनी जोखीम पत्करून चिनी खलाशाचे प्राण वाचवले. ही खऱ्या अर्थाने मानवीय दृष्टिकोनातील मदत असून, याद्वारे ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देण्यात आला आहे, असे तटरक्षक दलाने म्हटले आहे.रात्री उड्डाणाची सक्षमता नाही‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि.’ने तयार केलेले ‘एएलएच ध्रुव’ हे हेलिकॉप्टर वास्तवात रात्रीच्या उड्डाणासाठी सक्षम नाही. त्यातून या बचावावेळी वातावरणही उड्डाणायोग्य नव्हते; तसेच हे हेलिकॉप्टर हलक्या श्रेणीतील असल्याने अशा प्रकारच्या उड्डाणात फार मोठी जोखीम असते. ती बाजूला सारून वैमानिकांनी त्यांचे कौशल्य दाखवले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IsZLcDE
No comments:
Post a Comment