Breaking

Thursday, August 17, 2023

भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाला घरघर, उत्पादनात २० टक्के घट; कामगारांचा अन्य क्षेत्रांकडे ओढा https://ift.tt/4YEIqbQ

ठाणे : मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाला घरघर लागली असून, येथील मजुरांअभावी यंत्रमाग उत्पादनात २० टक्के घट झाल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही विदारक स्थिती समोर आली आहे. यंत्रमाग उद्योगापेक्षा जास्त मेहनताना आणि कामाची ठरलेली वेळ या कारणास्तव कामगार अन्य क्षेत्रांकडे आकर्षित होत आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनक्षमतेवर होत असून, यंत्रगाम उद्योजकांना वेळेत माल पोहोचवणे अवघड झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.भिवंडीमध्ये अंदाजे १२ लाख यंत्रमाग असून, देशातील एकूण यंत्रमागांपैकी ३३ टक्के यंत्रमाग येथे आहेत. येथील यंत्रमाग उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे दहा हजार कोटींची असून, हा उद्योग भिवंडीमध्ये ७०० चौ.किमी क्षेत्रात पसरलेला आहे. या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणावर कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला असून, बहुतेक कामगार परराज्यातील आहेत. भिवंडीमध्ये दररोज ४२० लाख मीटर ग्रे, प्रिंटेड, डाइड, सुती तसेच कापडाच्या विविध प्रकारचे मिक्स, सिंथेटिक आणि अन्य धाग्यांपासून कापडाचे उत्पादन होते. त्याचबरोबर देशातील विविध भागांत तसेच परदेशातही भिवंडीमधून मालाचा पुरवठा केला जातो. कधीकाळी देशाच्या यंत्रमाग उत्पादनात ४० टक्के वाटा भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाचा होता. २० लाख कुटुंबांना रोजगार पुरवणाऱ्या भिवंडीची उत्पादनक्षमता अलीकडेच मजुरांअभावी २० टक्क्यांनी घटल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. या उद्योगात काम करणारे कामगार काही कारणास्तव अन्य क्षेत्रांकडे वळत असल्याने अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर यंत्रगामधारक इतरही अनेक समस्यांनी त्रस्त असल्याचे दिसत आहेत. पंरतु, यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवण्याकडे सरकारकडून आवश्यक प्रयत्न होत नसल्याचे बोलले जात आहे.औद्योगिक वापरासाठी सात टक्के जमीनभिवंडी-निजामपूर महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित केलेल्या जमीन वाटपानुसार ४६ टक्के म्हणजेच १,२२० हेक्टर जमीन निवासी वापरासाठी देण्यात आली आहे. सात टक्के जमीन औद्योगिक वापरासाठी तीन टक्के म्हणजे ७६ हेक्टर जमीन मिश्र व व्यावसायिक वापरासाठी, १०० हेक्टर जमीन मोकळ्या जागा तसेच उद्याने, बागांसारख्या विरंगुळ्याच्या ठिकाणांसाठी देण्यात आली आहे. डोंगराळ भाग तसेच वनक्षेत्राचा परिसर ११ टक्के म्हणजे २९० हेक्टर असल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.साक्षरतेचे प्रमाणही कमीभिवंडी-निजामपूर महापालिकेच्या क्षेत्रात साक्षरतेचे प्रमाणही मुंबई महानगर प्रदेशामधील ग्रामीण भागापेक्षाही कमी आहे. येथील कापड उद्योगात काम करणारे बहुतांश स्थलांतरित कामगार अशिक्षित असल्यामुळे हे प्रमाण कमी असावे, अशी शक्यताही या अहवालातून व्यक्त केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X18HbWN

No comments:

Post a Comment