Breaking

Thursday, August 10, 2023

Weather Forecast: पुढील दोन आठवडे पाऊस कमी, शेतकरीराजा चिंतेत; पावसात इतके टक्के तूट https://ift.tt/ZjuYVRp

मुंबई : ऑगस्टमध्ये पावसाने हात आखडता घेतल्यानंतर १० ऑगस्टपर्यंतच्या अपेक्षित पावसापेक्षा ६५ टक्के पाऊस राज्यात कमी पडला आहे. ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत राज्यात पावसाची तीव्र तूट नोंदली गेली आहे. यासोबतच येत्या दोन आठवड्यांतही पावसाचे प्रमाण कमी असेल, अशी माहिती गुरुवारी भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे शेतीसमोरचा प्रश्न अजूनही बिकट असल्याचे समोर आले आहे.ऑगस्टच्या १० तारखेपर्यंत राज्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस पडतो. हा पाऊस केवळ ३७.३ मिलिमीटर नोंदला गेला आहे. १ जून ते १० ऑगस्टपर्यंतचा पाऊस लक्षात घेतला तर प्रत्यक्ष पाऊस ६४३.६ मिलिमीटर असून सरासरी पाऊस ६४१.९ मिलिमीटर असतो. त्यामुळे हा पाऊस आता सरासरीएवढाच नोंदला गेला आहे. यामध्ये रायगड, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नांदेड या जिल्ह्यांमधील अतिरिक्त पावसाने पावसाची सरासरी गाठण्यास मदत केली आहे. सांगली, सातारा, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत कोकण विभाग, विदर्भ विभाग येथे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. १८ ते २४ ऑगस्ट या कालावधीतही कोकण विभागात फारसा पाऊस नसेल, असा अंदाज आहे. या आठवड्यात विदर्भ विभागात काही ठिकाणी पाऊस पडू शकेल. २५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विदर्भ आणि कोकणाच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकेल, मात्र उर्वरित महाराष्ट्रात फारशा पावसाची शक्यता नाही, असे चार आठवड्यांच्या पूर्वानुमानावरून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर आधीच फारसा पाऊस न पडलेल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मराठवाड्यामध्ये काही जिल्हे सरासरी पावसाच्या श्रेणीत असले, तरी या श्रेणीमध्ये पावसाची काहीशी तूटसुद्धा सर्वसाधारण समजली जाते. त्यामुळे नांदेडमधील अतिरिक्त पाऊस आणि लातूरमधील सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक पाऊस वगळता मराठवाड्यात पावसाची मोठी तूट आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dbFhvWz

No comments:

Post a Comment