आदित्य भवार, पुणे : ढोलताशा पथकातील एका मुलाचं अपहरण करुन त्याचा खून झाल्याची घटना नुकतीच पुण्यात घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. पुण्याला हादरवून टाकणारी ही घटना ताजी असतानाच आज आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहींहडी फुटल्यानंतर दोन गटात वाद होऊन हाणामारी सुरु झाली. यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला पांगवलं. हा वाद ढोल ताशा पथकाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. हा सगळा प्रकार आप्पा बळवंत चौकात घडला.पुणे शहरामध्ये आज मोठ्या उत्साहात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दहा वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पुण्यात डीजेच्या तालावर नागरिक नाचत होते. मात्र, दहीहंडी फुटल्यानंतर आपापल्या दिशेने मार्गस्थ होत असताना धक्काबुक्की झाल्यानं दोन गटात झालेली पाहायला मिळाली. पुण्यातल्या प्रसिद्ध असलेल्या आप्पा बळवंत चौकात हा सगळा प्रकार घडला. तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं दोन गटांमध्ये झटापट आणि हाणामारी सुरू होती. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाला हाणामारी पासून रोखलं आणि जमलेल्या जमावाला पांगवून दिलं. पुण्यात ढोल ताशा पथकांच्या वादकांमध्ये आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा थरार रंगला होता. पहिल्यांदा ढोल ताशा पथकाच्या वादकांनी मंडळाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारलं. मात्र तिथे उपस्थित असलेल्या काही पोलिसांनी मध्यस्थी करत त्या कार्यकर्त्याला तिथून बाजूला काढलं. त्याच दरम्यान त्या कार्यकर्त्यांनी मंडळातल्या काही सदस्यांना त्या ठिकाणी बोलवत वादकांवर पलटवार केला. पोलिसांचं संख्याबळ कमी असल्यामुळे पोलिसांना कार्यकर्त्यांना आवर घालणं कठीण जात होतं. त्यावेळी मंडळाचे कार्यकर्त्यांनी वादकांवर बरसत होते. त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी खूप जमली होती आणि मोठा गोंधळ आप्पा बळवंत चौक परिसरात घडला होता. मात्र काही वेळानंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा आल्यानंतर पोलिसांनी गोंधळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणलं आणि जमलेली बघायची गर्दी पांगवली. या वादामुळं दहीहंडीच्या पुण्यातील यंदाच्या उत्सवाला गालबोट लागलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uECKL1l
No comments:
Post a Comment