म. टा. खास प्रतिनिधी, मंबई: मुंबई जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यंदा विसर्जनस्थळाच्या नजीकच्या भागातील सार्वजनिक वाहनतळावर विसर्जनाच्या दिवशी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी यानिमित्त दिली.मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या सभागृहात यासंबंधी बैठक झाली. मुंबई पोलिस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या विविध प्राधिकरणाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. पिण्याचे पाणी, निर्माल्य, पार्किंग, बस, रेल्वेसेवा तसेच शौचालयाची सुविधा देण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने याआधीच्या बैठकीत मांडलेल्या विविध ५२ मुद्द्यांवरही यावेळी विचारविमर्श करण्यात आला. या बैठकीनंतर केसरकर यांनी वाहनतळावर विनामूल्य सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले. गणेशोत्सव कालावधीत भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांची विसर्जनस्थळी गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी विविध यंत्रणांनी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.प्रमुख विसर्जनस्थळी भाविकांना पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात येतील. भाविक व गणेशोत्सव मंडळांच्या निर्माल्याच्या व्यवस्थेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सुसज्ज आहे. तर विसर्जन परिसरातल्या शौचालयाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. गणेशोत्सव कालावधीत मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केसरकर यांनी दिल्या. विसर्जनस्थळाच्या परिसरात पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचे फलक लावून जनजागृती करा, विसर्जन मिरवणूक मार्गावर चिन्हे आणि दिशादर्शक फलक व खुणांचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिस आणि मुंबई पालिकेला दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wibPsmc
No comments:
Post a Comment