जळगाव: म्हशींना पाणी पाजण्यासाठी जात असताना अचानक बोरी नदीला पूर आला. यात पाय घसरून शेतकरी वाहून गेल्याची घटना पारोळा तालुक्यातील भिलाली गावाजवळ बोरी नदीच्या पुलावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली होती. राज्य आपत्ती दलाच्या पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता एका शेतात त्यांचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमलाकर हिंमत पाटील (५०) रा. भिलाली ता पारोळा असे पुरात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील बोले नदीला शुक्रवारी अचानक मोठा पूर आला. त्यामुळे तामसवाडी येथील बोरी नदीवरच्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. पिलाली गावातील रहिवासी कमलाकर पाटील हे त्यांच्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना अचानक गावाजवळ बोरी नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्याचा प्रवाह आला. यावेळी पाय घरून कमलाकर पाटील हे खाली पडले. त्यानंतर पुराच्या पाण्यात वाहून गेले. याबाबतची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तथापि यात यश आले नाही. अखेर यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाला दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम राबवित नदीपात्रात सुमारे दोनशे फुट अंतरावर त्यांचा मृतदेह पहाटे आढळून आला असून एसडीआरएफच्या पथकाने त्यांचे पार्थिव बाहेर काढले. मयत कमलाकर हिंमत पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी तसेच तीन भाऊ व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. ते दुध विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pbBrxa3
No comments:
Post a Comment