नागपूर: स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे हे त्याचे स्वप्न होते. मात्र त्यात अपयश आल्याने तो चक्क चोऱ्या करायला लागला. आता लोहमार्ग पोलिसांनी त्याच्यासह सहकाऱ्यांना गजाआड केले आहे. सतीश चाबुकस्वार (३२) रा. छत्रपती संभाजीनगर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर विक्रम सुकनगे (३१) रा. नांदेड, कैलास एरणे (३७) रा. अहमदनगर आणि अरुण दरेकर रा. नाशिक अशी अटकेतील अन्य आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सात लाख रुपये किमतीचे दागिने, सव्वा दोन लाख रुपयांचे मोबाइल असा एकूण ९ लाख २४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूर येथील परमानंद खत्री हे पाटणा एक्स्प्रेसने पत्नीसह प्रवास करीत असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकाजवळ आरोपींनी त्यांच्या पत्नीची पर्स चोरली. पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख १८ हजार रुपये असा एकूण ४ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक तपास केला तसेच गुप्त बातमीदारांची मदत घेतली. आरोपी अरुण आणि कैलास दोघेही पुन्हा चोरीच्या तयारीत होते. योजना आखण्यासाठी ते वरंगलच्या लॉजमध्ये असल्याची गुप्त माहिती नागपूर लोहमार्गचे पोलीस हवालदार महेंद्र मानकर यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून दोघांनाही पकडले. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे बल्लारशाह येथील लॉजमध्ये दडून बसलेल्या सतीश आणि विक्रमलाही पडकले. चौघांनाही पोलीस ठाण्यात आणून त्यांची सखोल चौकशी केली. त्यांनी वर्धा, नागपूर, इटारसी, बल्लारशाह येथे चोऱ्या केल्याची कबुली दिली. इतर गुन्ह्यातील चोरीचे दागिने वितळवल्याची कबुली त्यांनी दिली. यातील सतीश हा पदवीधर असून तो स्पर्धा परीक्षा द्यायचा. मात्र, त्याला यश आले नाही. एकदा बीअर बारमध्ये इतर आरोपींशी त्याची ओळख झाली. त्यांनी चोरीची योजना आखली. सुरुवातीला ते केवळ मोबाइल चोरायचे. मग रेल्वेत त्यांनी मोठ्या चोऱ्या सुरू केल्या. पाटणा विशेष रेल्वे, हिसार एक्स्प्रेस, चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेस, काजीपेठ-दादर एक्स्प्रेस आदी गाड्यांमध्ये ते चोऱ्या करायचे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, हवालदार महेंद्र मानकर, विनोद खोब्रागडे, नितीन शेंडे, गिरीश राऊत, मंगेश तितरमारे यांनी केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/O8iu6oJ
No comments:
Post a Comment