पुणे: नोकरीच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील तीन महिलांना पुण्यातून सौदी अरेबियाला नेऊन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांना मारहाण करून उपाशी ठेवण्यात येत होते. राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नामुळे तीन महिलांची सुटका करण्यात यश आले. याप्रकरणी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांना ओळखीच्या महिलेने सौदी अरेबियात कामासाठी जाण्याचा सल्ला दिला होता. या महिला मुंबईतील एका मध्यस्थाच्या मार्फत सौदी अरेबियात गेल्या. तेथील मध्यस्थाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घरकामासाठी पाठवले. मात्र, घरमालकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना वेतन नाकारून उपाशीही ठेवण्यात आले. पीडित महिलेला राज्य महिला आयोगाचा ईमेल आयडी मिळाला. यातील एका महिलेने तेथे ईमेल करून सुटका करण्याची विनंती केली. महिला आयोगाने तीन महिने सातत्याने प्रयत्न करून त्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया राबवली. आठ दिवसांपूर्वी या महिला पुण्यात दाखल झाल्या, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते. राज्य महिला आयोगाने वीस महिलांची परदेशातून सुटका केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील बहुतेक महिला आखाती देशात नोकरीनिमित्त गेल्या होत्या. परदेशात नोकरीसाठी गेलेल्या महिलांनी फसवणूक झाली असल्यास त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी राज्य महिला आयोगाशी संपर्क साधावा, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EUPJIdD
No comments:
Post a Comment