Breaking

Monday, September 25, 2023

रब्बीच्या पेरणीला दिलासा; पावसामुळे मराठवाड्यातील पर्जन्यतूट भरण्याची शक्यता, पिकांबाबत सल्ला https://ift.tt/xrk4I5s

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. काही खरीप पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. परतीच्या पावसात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कोरडवाहू पिकांची लागवड करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.जिल्ह्यास मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या आठ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसात मराठवाड्यातील पर्जन्यतूट भरुन निघेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ५५६ मिलिमीटर असून आतापर्यंत ४८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तूर आणि कापूस या खरीप पिकांना फायदा होणार आहे. तर मका, मूग पिकांची वाढीची अवस्था संपल्यामुळे त्यांना उपयोग होणार नाही. रब्बीतील कोरडवाहू पिकांची येत्या पंधरा दिवसात पेरणी करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. रब्बी ज्वारी, हरभरा, करडई, जवस या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांसाठी अनुकूल स्थिती आहे. ज्वारीमुळे कडबासुद्धा मुबलक उपलब्ध होऊ शकेल. आणखी काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा, असे कृषी तज्ज्ञ डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले.जिल्ह्यात सहा लाख २४ हजार हेक्टर खरीप पिकांचे क्षेत्र आहे. कापसाच्या सर्वाधिक तीन लाख ६७ हजार क्षेत्राचा त्यात समावेश आहे. बाजरी १४ हजार ९९४ हेक्टर, मका एक लाख ७१ हजार ४३६ हेक्टर, तूर २४, ४८८ हेक्टर, सोयाबीन २७ हजार ७३० हेक्टर असे पिकनिहाय क्षेत्र आहे. यंदा पावसाचा अडीच महिने खंड पडल्यामुळे उत्पादनात निम्मी घट होण्याची शक्यता आहे. खरीप पीक हातचे गेले असून रब्बी हंगामासाठी पुरेसा पाऊस होणे अपेक्षित आहे.दरम्यान, विभागात फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. केसर आंब्याचे ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. नवीन लागवड केलेल्या फळबागांना पाणी टंचाईचा फटका बसला होता. मोसंबी, डाळींब फळबागांनाही पाणी नव्हते. उशिराच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सध्याच्या पावसाचा तूर आणि कापूस पिकाला फायदा होईल. इतर पिकांची दाणे भरण्याची, वाढीची अवस्था संपली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सप्टेंबर अखेरीस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरडवाहू रब्बी पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना फायदा होणार आहे.-डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक, कृषी विज्ञान केंद्र


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ayBQMz

No comments:

Post a Comment