जळगाव : आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रुग्णालयात भेटून पुन्हा गावाकडे परतत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने या अपघातात एका दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. तर अपघातानंतर कारला मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने एकूण चार जण जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर गावाजवळ आज गणेशचतुर्थीच्या दिवशी दुपारी हा विचित्र अपघात झाला. रोहित मुकेश गाढे (वय १९, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) आणि प्रदीप छगन वाघ (वय २८, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. काही वेळापूर्वी ज्या रुग्णालयातून तरुण परतले होते, त्याच रुग्णालयात तासाभराने दोघा तरुणांचे मृतदेह आणण्यात आल्याचा दुर्दैवी योगायोगही यावेळी पाहायला मिळाला. मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर दीपकचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे आणण्यात आला होता. त्याला पाहण्यासाठी दीपकच्या पूर्णाड गावातील रोहित गाढे आणि प्रदीप वाघ हे दोघेही दुचाकीने मंगळवारी दुचाकीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आले होते. दीपकला पाहून पुन्हा दोघेही घरी जाण्यासाठी निघाले, मात्र रस्त्यातच त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. यात रोहित व प्रदीप हे जागीच गतप्राण झाले. तर या अपघातात कारमधील कमलेश सुभाष पाटोळे, लिलाबाई सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे (सर्व रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर) हे कारमधील जखमी झाले. दरम्यान, या अपघातामुळे कारपाठोपाठ येणाऱ्या दोन दुचाकी सुद्धा या गाड्यांवर आदळल्यामुळे विचित्र अपघात होऊन त्यामध्ये दोन्ही दुचाकीवरील अशोक गंगाराम सावळे (पातोंडी ता. रावेर) हे सुद्धा गंभीर जखमी झालेले आहे. अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत जखमींना प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी रवाना केले. तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमी रुग्णाची भेट घेतली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक तसेच नागरिकांची रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आधीच एकाची आत्महत्या, तर दुसरीकडे अपघातात पुन्हा दोघा तरुणांचा मृत्यू अशाप्रकारे एकाच गावातील तीन तरुणांच्या मृत्यूने गणेश चतुर्थीच्या दिवशी पूर्णाड गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vNnekmQ
No comments:
Post a Comment