म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गुरुवारपासून सक्रीय झालेल्या मान्सूनने कोकण विभागात शुक्रवारी दमदार उपस्थिती लावली. पावसाचा जोर वाढल्यानंतर हवामान विभागातर्फे पावसाचा इशारा अद्ययावत करण्यात आला आणि दक्षिण कोकणासह उत्तर कोकणातही ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला. महाबळेश्वर, नाशिक येथेही शुक्रवारी दिवसभरात मुसळधार पाऊस नोंदला गेला. मात्र उर्वरित महाराष्ट्रात पावसाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. पावसाळ्याच्या चौथ्या आणि शेवटच्या महिन्यात १६ जिल्ह्यांमध्ये तूट असल्याची नोंद झाली आहे.मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या दरम्यान सांताक्रूझ येथे ७० मिमी, तर कुलाबा येथे ४६ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासूनच अधूनमधून जोरदार सरींनी उपस्थिती लावली. हर्णे येथे दिवसभरात ११६ मिमी, अलिबाग येथे ५२ मिमी, तर रत्नागिरी येथे ३४ मिमी पाऊस नोंदला गेला. महाबळेश्वर येथे ७९, तर नाशिक येथे ६२ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रगती फारशी सुखावह नव्हती.राज्यात सध्या १६ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे, तर १७ जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे. पावसाची सर्वाधिक तूट जालना जिल्ह्यामध्ये (४७ टक्के) आहे. मध्य महाराष्ट्रात सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाची ४० टक्के तूट आहे. अहमदनगर येथेही ३७ टक्के तूट नोंदली गेली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे ३२ टक्के, बीड येथे ३८ टक्के, हिंगोली येथे ३७ टक्के, परभणी येथे ३० टक्के तूट आहे. विदर्भात अमरावती येथे ३७ टक्के, अकोला येथे ३३ टक्के, बुलडाणा येथे २३ टक्के, तर वाशिम येथे २० टक्के तूट आहे.भारतीय हवामान विभागाने गुरुवारी नोंदवलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग, विदर्भाचा काही भाग येथे पाऊस पडू शकतो. २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस तरी पावसामुळे दिलासा मिळेल का, पावसाची किती तूट भरून निघेल आणि त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ChfBuMw
No comments:
Post a Comment