मुंबई : भांडुप भट्टीपाडा जंक्शन येथील रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी तब्बल ४० वर्षे जुनी ६४ बांधकामे महापालिकेकडून पाडण्यात आली. भट्टीपाडा जंक्शन येथील खोत मार्ग, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग आणि भट्टीपाडा मार्ग एकत्र येऊन तयार होणाऱ्या चौकासाठी ही बांधकामे अडसर ठरत होती. भट्टीपाडा जंक्शन येथील अरुंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. तसेच येथील चौकाच्या रुंदीकरणाचे काम भांडुप एस विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी उपायुक्त (परिमंडळ ६) देविदास क्षीरसागर, एस विभागाचे सहायक आयुक्त महादेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अभियंता पथकासह अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता. कारवाईसाठी एक पोकलेन, तीन जेसीबी, सहा डंपर, १० अधिकारी आणि ४९ कामगार तैनात होते. तसेच, भांडुप पोलिस ठाण्याकडून पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.भट्टीपाडा जंक्शन चौक रुंदीकरणामुळे टेंबीपाडा, गावदेवी, ॲन्थोनी चर्च, छत्रपती शिवाजी महाराज तलाव या भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. या भागातील रहिवाशांना भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता. या कारवाईमुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातील गावदेवी नाला रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणीदेखील रीतसर परवानगीने करण्यात आली.साधारणपणे ४० वर्षे जुने असलेली बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरण मार्गी लागणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/J8QwD1X
No comments:
Post a Comment