मुंबई: क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा भारत या स्पर्धेचा आयोजक आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यानं स्पर्धेची सुरुवात झाली. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या रंगेल. या दरम्यान सोशल मीडियावर विराट कोहलीशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विराट कोहलीला सीमा सुरक्षा दलाच्या पदावरुन दूर करण्यात आल्याचा दावा त्यातून केला जात आहे.भारत विरुद्ध पाकिस्तान सामना काही दिवसांपूर्वीच आशिया कपमध्ये रंगला. त्यावेळी कोहलीनं पाकिस्तानी खेळाडूंची गळाभेट घेतली. त्यानंतर बीएसएफनं त्यानं ब्रँड ऍम्बेसेडर पदावरुन हटवलं असा दावा करण्यात येत आहे. फेसबुकवर अनेकांनी व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. 'विराट कोहलीबद्दल बीएसएफचा एक वाईट निर्णय', अशा आशयाचा मजकूर व्हिडीओसोबत आहे. खरं काय? खोटं काय?विराट कोहलीला बीएसएफच्या पदावरुन दूर करण्यात आल्याचा दावा आम्ही पडताळून पाहिला. त्यासाठी , बीएसएफ असे काही कीवर्ड्स आम्ही गुगलवर सर्च केले. मात्र यासंदर्भात कोणतंही खात्रीशीर, विश्वासार्ह वृत्त सापडलं नाही. आम्हाला २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी सापडली. ती कोहलीला सीमा सुरक्षा दलानं ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून निवडल्याची होती. त्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला तत्कालीन मंत्री आर. पी. एन. सिंह उपस्थित होते. विराटला बीएसएफची हॅट आणि ब्लेझर देऊन सन्मानित करण्यात आलं. केंद्रीय निमलष्करी दलानं ब्रँड ऍम्बेसेडर नियुक्त करण्याची ही पहिलीच वेळ होती. विराट कोहलीला ब्रँड ऍम्बेसेडर पदावरुन दूर केल्याचा दावा बीएसएफचे पीआरओ कृष्णाराव यांनीही फेटाळून लावला. त्यांनी व्हायरल दाव्याचं खंडन केलं. 'कोहलीला बीएसएफच्या ब्रँड ऍम्बेसेडर पदावरुन हटवण्यात आल्याचा दावा खोटा आहे,' असं कृष्णाराव म्हणाले. त्यामुळे कोहलीसंदर्भात व्हायरल होणारी पोस्ट आणि त्यातील दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट झालं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/q8fQ2mu
No comments:
Post a Comment