Breaking

Saturday, October 7, 2023

Mumbai LTT: प्रवाशांची सोय होणार, मुंबई एलटीटीत दोन्ही दिशांनी प्रवेश; वाचा सविस्तर https://ift.tt/VnXkL3W

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसमधून (एलटीटी) सर्वसामान्य प्रवाशांची वर्दळ सुलभ आणि प्रशस्त जागेतून व्हावी, यादृष्टीने मध्य रेल्वेने हालचाली सुरू केल्या आहेत. एलटीटी पुनर्विकास आराखडा रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. आराखड्यानुसार रेल्वे प्रवाशांना पूर्वेप्रमाणे पश्चिमेकडूनही टर्मिनसमध्ये प्रवेश करणे आणि बाहेर पडणे शक्य होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मेल-एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासह देशाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेतील रेल्वेगाड्यांची वेगाने हाताळणी करण्यासाठी सन १९९१मध्ये एलटीटी उभारण्यात आले. एकूण दोन एकर जागेत टर्मिनस परिसराचा विस्तार आहे. सामान्यत: रेल्वे स्थानक आणि रेल्वे टर्मिनसमध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांनी प्रवासी ये-जा करण्याची सुविधा असते. मात्र एलटीटीमध्ये केवळ पूर्वेकडूनच ही सोय होती. पश्चिमेकडून प्रवासी वर्दळ हाताळण्यासाठी सर्व फलाटांना जोडणारा पादचारी पूल आणि सरकते जिने बसवण्याचा समावेश एलटीटी पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पादचारी प्रवाशांसाठी कुर्ला पश्चिम ते एलटीटीमधील सर्व फलाटांना जोडणारा पादचारी पूल आणि वाहनचालकांसाठी उड्डाणपूल उभारणे, असे दोन पुनर्विकास प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत. रेल्वे मंडळाकडे या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. व्यवहार्य आराखडा मंजूर झाल्यावर निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे, असे अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या स्थानकात रस्तेमार्गे पोहोचण्यासाठी वाहनचालक सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा (एससीएलआर) वापर करतात. रेल्वे प्रवाशांना पश्चिमेकडून प्रवेशाचा पर्याय खुला झाल्यास एससीएलआरवरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. एलटीटीमध्ये पाच फलाट आहेत. आणखी तीन फलाटवाढीचे नियोजन आहे. नव्या फलाटातून नव्या मार्गावर रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार आहेत. पूर्वेकडील एकाच दिशेकडे गर्दी होऊ नये, यासाठी हा पर्याय आहे. सध्या ५६ रेल्वेगाड्यांतून सुमारे ६० हजार प्रवाशांची वर्दळ टर्मिनसमधून हाताळण्यात येते. प्रवाशांसाठी २५ हजार चौरस मीटर इतका स्थानक परिसर आहे.वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिकासध्या टर्मिनसबाहेर रिक्षाचालकांची रांग लागते. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत बस, खासगी वाहन, रिक्षा/टॅक्सी यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे नियोजन आहे. रेल्वे मंडळाच्या स्थानक/टर्मिनस पुनर्विकास धोरणानुसार नव्याने उभारण्यात येणाऱ्या बांधकामात नैसर्गिक वायुविजनची व्यवस्था करण्याच्या सूचना आहेत. एलटीटीमध्ये उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलामध्ये त्याचा समावेश असणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C3QPsYh

No comments:

Post a Comment