पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेने या रविवारी (५ नोव्हेंबर) फळभाज्यांची आवक वाढली. परिणामी, कांदा, हिरवी मिरची, वांगी, शिमला मिरचीच्या दरांत दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. अन्य भाजीपाल्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर आहेत.गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मध्य प्रदेश, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून दोन ते तीन टेम्पो शेवगा, इंदूर येथून दोन टेम्पो गाजर, बेळगाव येथून घेवडा तीन ते चार टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून एक ट्रक मटार, कर्नाटक येथून पावटा दोन ते तीन टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची १० टेम्पोंची आवक झाली होती.स्थानिक भागातून सातारी आल्याची ६०० ते ७०० गोण्या, भेंडी आणि गवार प्रत्येकी पाच ते सहा टेम्पो, टोमॅटो आठ ते १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची आठ ते १० टेम्पो, काकडी सात ते आठ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी आणि गाजर प्रत्येकी चार ते पाच टेम्पो, शिमला मिरची १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंगांची १०० ते १२५ गोण्या, पावटा दोन टेम्पो, मटार १५ ते २० गोण्या, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो इतकी आवक झाली. कांद्याची १०० ट्रक आणि बटाट्याची इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून ४० ते ४५ ट्रक आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्यांचे दर कडाडलेलेच
मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची दीड लाख आणि मेथीच्या ८० हजार जुड्यांची आवक झाली. पालेभाज्यांची मागणी वाढल्याने मेथी, कोथिंबीर, चाकवत, शेपू, मुळा, पालक आदी पालेभाज्यांच्या दरांत गेल्या आठवड्याच्या तुलनेने वाढ झाली आहे. आवक वाढल्याने चुका, करडई, चवळई, पुदीना आदीचे दर स्थिर आहेत.नवरात्रानंतर फुलांच्या दरात घसरण
मार्केट यार्डातील फूल बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक जास्त प्रमाणात होत आहे. त्यात फुलांची मागणी घटली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात फुलांच्या वाढलेल्या दरात आता पुन्हा घसरण झाली आहे. पुढील आठवड्यात दिवाळीत आणि विशेषत: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुलांच्या दरात तेजी येण्याची शक्यता फूल बाजारातील आडते सागर भोसले यांनी व्यक्त केली. घाऊक बाजारात सध्या एक किलो झेंडूसाठी १० ते २० रुपये मोजावे लागत आहेत. गुलछडी ३० ते ६० रुपये, कापरी १० ते २० रुपये, शेवंती २० ते ३० रुपये असा दर आहे. यासह गुलाबगड्डी १० ते २० रुपये, गुलछडी काडी १० ते २० रुपये, डच गुलाब (२० नग) ५० ते १२० रुपये, जर्बेरा १० ते ३० रुपये, कार्नेशियन ४० ते ८० रुपये, शेवंती काडी ८० ते १२० रुपये, लिलियम (१० काड्या) ८०० ते १००० रुपये, ग्लॅडिओ (१० काड्या) ८० ते १२० रुपये आणि जिप्सोफिला २०० ते ३०० रुपये असा दर आहे.चिकू, सीताफळ, लिंबू, डाळिंबाच्या दरांत घट
मार्केट यार्डातील फळबाजारात आवक वाढल्याने सीताफळ, चिकू, मोसंबी, डाळिंबाच्या दरांत दहा टक्क्यांनी घट झाली आहे. लिंबाच्या गोणीमागे २०० ते ३०० रुपये घट झाली आहे. मागणी वाढल्याने पपईच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली. इतर बहुतांश फळांची आवक-जावक सारखी असल्याने त्यांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात रविवारी डाळिंब ४० ते ४५ टन, अननस पाच ट्रक, मोसंबी ७० ते ८० टन, संत्रा ३० ते ४० टन, पपई तीन ते चार टेम्पो, कलिंगड सात ते आठ टेम्पो, खरबूज तीन ते चार टेम्पो, पेरू १५० क्रेट्स, सीताफळ २० ते ३० टन, चिकू दोन हजार बॉक्स, सफरचंद तीन ते चार हजार पेटी इतकी आवक झाली होती, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dkFmsl5
No comments:
Post a Comment