Breaking

Sunday, November 5, 2023

आधी गैरसमजातून शिवीगाळ; नंतर मित्रांसह प्राणघातक व्यवस्थापकावर हल्ला, नेमकं प्रकरण काय? https://ift.tt/HUfcOXJ

नवी मुंबई: कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून एका टँकर चालकाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकावर लोखंडी रॉड आणि चाकुच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तुर्भे एमआयडीसीतील एचपीसीएल कंपनीच्या बाहेर गुरुवारी रात्री घडली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील चार हल्लेखोरांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी रोहित यादव याला अटक केली आहे. पोलिसांनी आता या घटनेतील फरार असलेल्या इतर तीन हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेला उदयराज सिंग (४२) हा चेंबुर येथे राहण्यास आहे. तो स्वास्तिक लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. स्वास्तिक लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे तुर्भे एमआयडीसीतील एचपीसीएल कंपनीत ८ टँकर लावण्यात आले आहेत. या टँकरवर सागर यादव हा चालक म्हणून काम करत होता. सागर यादव हा टँकरचे व्हीटीएस बंद करुन टँकर चालवत असल्यामुळे एचपीसीएल कंपनीने त्याला काळ्या यादीत टाकले होते. ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक कुणाल यादव याच्या सांगण्यावरुन आपल्याला एचपीसीएल कंपनीने काळ्या यादीत टाकल्याचा सागर यादव याचा गैरसमज झाला होता. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी सागर यादव याने एचपीसीएल कंपनीच्या बाहेर कुणाल यादव याला भेटून त्याच्याशी वाद घालून त्याला शिवीगाळ केली. तसेच त्याचा बाकी असलेल्या पगाराची मागणी केली. त्यावेळी कुणाल यादव आणि व्यवस्थापक उदयराज सिंग यांनी सागर यादव याला त्याचा बाकी असलेले ८ हजार दिले होते. सागर यादव याच्याकडे टँकरची चावी असल्याने सांयकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कुणाल यादव आणि उदयराज सिंग हे दोघेही एचपीसीएल कंपनीच्या बाहेर त्याचा शोध घेत होते. त्यावेळी सागर यादव व त्याच्या तीन साथीदारांनी उदयराज याला शिवीगाळ केली. त्यानंतर सागर यादव, प्रदीप यादव आणि रोहित यादव या तिघांनी उदयराज याच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. यावेळी भोलू यादव याने उदयराज याच्या दंडावर चाकुने वार केले. यावेळी त्याठिकाणी आलेल्या कुणाल यादव याने चौघा हल्लेखोरांच्या तावडीतून उदयराज याची सुटका केली. यानंतर चौघा हल्लेखोरांनी त्या दोघांना शिवीगाळ करुन त्यांना बघून घेण्याची धमकी देऊन तेथून पलायन केले. या हल्ल्यात उदयराज हा गंभीर जखमी झाल्याने त्याला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी चौघा हल्लेखोरांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन रोहित यादव याला अटक केली आहे. तसेच पळून गेलेल्या इतर तिघांचा शोध सुरु केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uLPvFYo

No comments:

Post a Comment