नांदेड: दिवाळीसाठी एका मुख्याध्यापकाने बॅंकेतून ९० हजार रूपये काढले. परंतु बॅंकेतून गाडीपर्यंत ही जात नाही तोच चोरट्याने हातचालाखी करून ९० हजार लंपास केले. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील एसबीआय बॅंकेत बुधवारी दुपारी घडली. ही घटना बॅंकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरीच्या घटनेने बँकेत खळबळ उडाली होती. दिवाळी सण काही दिवसांवर आहे. दिवाळी सणाची लगबग देखील सुरु झाली आहे. पैसे काढण्यासाठी नागरिक बँकेत गर्दी करत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख हे बुधवारी दुपारी बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी हिमायत नगर शहरातील भारतीय स्टेट बैंकेच्या शाखेत गेले होते. आपल्या खात्यातून त्यांनी ९० हजार रुपये काढले. त्यानंतर त्यांनी बॅगमध्ये पैसे टाकून त्यांनी बॅग पाठीवर अडकवली. यावेळी दोन चोरटे त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. साहेबराव देशमुख बँकेत असताना एक चोरटा पिशवी घेऊन त्यांच्या मागे खेटून चालू लागला. बॅगची चैन काढून त्याने अलगद आपल्या पिशवीमध्ये पैसे काढून घेतले. चोरट्यांनी अवघ्या ५ ते ६ सेंकदात मुख्याध्यापकाचे ९० हजार रुपये लंपास केले. चोरी होताना थोडीही शंका देशमुख यांना आली नाही. बॅगेचे वजन अचानक कमी झाल्याने त्यांना पैसे गायब झाल्याचे लक्षात आले. हा चोरीचा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कैमेरात कैद झाली आहे. सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरी नेमकी कशी झाले ते लक्षात आले. दरम्यान या प्रकारानंतर साहेबराव देशमुख यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सीसीटिव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान दिवाळीनिमित्त बखरेदी साठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करत आहेत. तेव्हा बाजारपेठेत येताना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर यांनी केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aH6rVU8
No comments:
Post a Comment