बुलढाणा: ऐन दिवाळी सणाच्या दिवसालाच एकापाठोपाठ तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेरा बुद्रुक गावात दुःखाचा डोंगर पसरल्याने यावर्षी प्रथमच ग्रामस्थांचा दिवाळी सण अंधारात गेला. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक हे गाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे असून गावामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. या गावामध्ये दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येक कुटुंबातील बाहेरगावी राहणारे मुलेमुली गावात आले. दिवाळीचा सण असल्याने घरोघरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनी बाजारातून महागडे कपडे, विविध वस्तू, दागदागिने, किराणा, नवीन वाहन आदींची मोठ्या उत्साहात खरेदी केली होती. आता आनंदात दिवाळी साजरी करू असे चित्र संपूर्ण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर होते. मात्र अचानक मेरा बुद्रुक वासियांवर डोंगर कोसळला. दिवाळीच्या दिवशी एकापाठोपाठ तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ५३ वर्षीय संजय प्रल्हाद पडघन या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याच बरोबर सायंकाळच्या वेळेला रामभाऊ महादू गायकवाडचा तीव्र हृदयविकार झटक्याने निधन झाले. तिसरी घटना रात्री दहा वाजेच्या दरम्यान शांताबाई सखाराम भोकरे यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले. अशा या तिन्ही घटना एकापाठोपाठ घडल्याने गावकऱ्यांमध्ये ऐन दिवाळीचा उत्सव दुःखात साजरा करावा लागला. या तिन्ही जणांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत हजाराच्या संख्येने लहानांपासून तर वयोवृध महिला आणि पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hg0U8Nb
No comments:
Post a Comment