Breaking

Friday, November 3, 2023

पंचनामे की सरसकटमध्ये अडकली मदत? सरकारी यंत्रणा संभ्रमात; मात्र शेतकऱ्यांच्या वाटेला प्रतीक्षाच https://ift.tt/WgYph21

पुणे: राज्य सरकारने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट की पंचनाम्याच्या आधारे मदत द्यावी, याबाबत राज्यातील महसूल तसेच कृषी विभागात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी एकमेकांकडे विचारणा करत असून सरकारकडून नवे काही मार्गदर्शन येत आहे का त्याची प्रतीक्षा करत आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड तसेच पिक आणि मातीतील आर्द्रतेचे परिणाम प्रमाण या निकषांवर राज्यातील राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील २४ तालुक्यांमध्ये गंभीर तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. २१ दिवसांपेक्षा अधिक पाऊस, तसेच पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा पहिला निकष लागू झाला. पीक निर्देशांक तसेच जमिनीतील आर्द्रतेचा निर्देशांक या निकषांचा आधार घेऊन १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा, अशी शिफारस सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार २४ तालुक्यांमध्ये गंभीर तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळ जाहीर करताना राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे, असा उल्लेख केला आहे. परंतु, खरीप हंगाम संपला आहे. शेतात रब्बी हंगामाची पिके उभी आहेत. त्यामुळे पंचनामा करायचा तर कसा आणि कोणत्या पिकांच्या आधारे करायचा असा प्रश्न महसूल विभागाला पडला आहे. दरम्यान, काही तालुक्यांमधील काही भाग बागायती पट्टा आहे. त्या भागाचे पंचनामे कसे करावे याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे सरसकट की पंचनामे करून त्या आधारे मदत द्यावी याबाबत स्पष्टता नसल्याने महसूल यंत्रणेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या मार्गदर्शनाकडे महसुली यंत्रणेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दुष्काळ जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारचे काही पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे, काय याकडे यंत्रणेचे लक्ष लागले आहे. हे पथक आल्यास त्यांच्यामुळे मदत देणे सोपे ठरेल, असा होरा अधिकाऱ्यांचा आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर, बारामती ही दोन तालुके गंभीर तर शिरूर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील ६१ हजार २५९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ लाख ३१० शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर शिरूर, इंदापूर व दौंड या तालुक्यांमधील ५२ हजार ४६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून येथील १ लाख १३ हजार ६८४ शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jz1HiFv

No comments:

Post a Comment