नागपूर : राज्यातील तीन ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये १,६२४ मुले तर १,५९० मुली अशी एकूण ३ हजार २१४ मुले शाळाबाह्य आढळल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
'शाळा बंद'वर उपप्रश्न
विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. 'एकट्या मुंबईमध्ये एकूण ३५६ बालके शाळाबाह्य आढळली असून त्यांना शाळेत दाखल करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात ३८० बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत,' अशी माहिती या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर यांनी दिली. या वेळी शिक्षकभरती आणि २० पेक्षा कमी पटसंख्या असलेली शाळा बंद करण्याच्या निर्णयावर सर्वपक्षीय सदस्यांनी उपप्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरे देताना केसरकर यांनी राज्यात पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले.'शाळा बंद होणार नाहीत'
'राज्य सरकारकडून नवीन धोरण आणले जात आहे. त्यामुळे कुठल्याही शाळा बंद होणार नाहीत. उलट, शाळांची संख्या वाढेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पूर्व प्राथमिक नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनिअर केजी अर्थात बालवाटिका हे धोरण अमलात आणले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार नाही; तसेच सरकारने ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची बिंदुनामावली तपासण्याचे काम सुरू आहे. बिंदुनामावली अंतिम झाल्यानंतर येत्या दोन महिन्यांमध्ये संबंधित शिक्षकांना त्या-त्या जिल्ह्यात नियुक्ती दिल्या जातील. शाळाबाह्य आणि वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात नगरविकास विभाग, शालेय शिक्षण तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्यात समन्वय राखला जाईल,' असेही केसरकर यांनी सांगितले. या वेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, भाजपच्या आशिष शेलार, योगेश सागर आदींनी उपप्रश्न विचारले.माध्यान्ह भोजन योजनेची तपासणी
ग्रामीण भागाप्रमाणे आता शहरी भागातही शिजलेल्या माध्यान्ह भोजनाची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. चेंबूर येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या विषबाधेबाबत समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी प्रश्न विचारला होता. 'हिंदी माध्यमाच्या १८९, मराठी माध्यमाच्या ५१ विद्यार्थ्यांनी त्या दिवशी माध्यान्ह भोजनेचा लाभ घेतला होता. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांना त्रास झाला. या घटनेनंतर मी सेंट्रल किचनला भेट देणार असून ग्रामीण भागात जसे अन्न तपासले जाते, तेच सूत्र आता शहरी भागातही लागू केले जाईल,' असे केसरकर यांनी उत्तरात सांगितले. या घटनेसंदर्भातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा लवकरात लवकर अहवाल मागून घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, समाधान औताडे, मनीषा चौधरी आदींनी उपप्रश्न विचारले.'सर्वेक्षणच चुकीचे'
'केवळ तीन हजार मुळे शाळाबाह्य आहेत, हा सरकारने दिलेला आकडा चुकीचा आहे. एका बालकाच्या शिक्षणाची व्यवस्था करणेही शासनाची जबाबदारी आहे. मुळात हे सर्वेक्षण चुकीचे असून ते पुन्हा करण्यात यावे,' अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली, तर अनेक भागांत शिक्षकच नाही. शिक्षकांच्या एक लाख २० हजार जागा रिक्त आहेत. अडीच वर्षे झाली तरी यात सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही, असा रोष विरोधी पक्षतेने विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BK5IYju
No comments:
Post a Comment