नागपूर: सुरत हे छान शहर आहे, असे ऐकले होते. शिवाजी महाराज तेथे गेले होते त्यामुळे मीसुद्धा गेलो, असे उत्तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद (शिंदे गट) भरतशेठ गोगावले यांनी उलट तपासणी दरम्यान दिले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत मुंबईत सुरू असलेली उलट तपासणी सध्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष सुरू आहे. यात मंगळवारी शेवाळे यांची उर्वरित साक्ष नोंदविण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी यावेळी गोगावले यांची उलटतपासणी घेतली. शिंदे गटाचे प्रतोद या नात्याने त्यांची साक्ष महत्त्वाची समजली जाते. कामत यांनी विचारले, २० जून रोजी राज्यातून बाहेर पडताना तुम्ही सुरत शहरच का निवडले? यावर गोगावले म्हणाले, शिवाजी महाराज सुरतेला गेले होते त्यामुळे मीसुद्धा गेलो. ४ जुलै २०२२ रोजी हॉटेल प्रेसिडेंट मध्ये ४० आमदार उपस्थित होते. आपण त्यांना स्वत:हून व्हीप त्यांच्या हाती दिला. मात्र उर्वरित १५ आमदारांना व्हॉट्सॲपवरून व्हीप पाठविण्यात आल्याचे गोगावले यांनी कबूल केले. हा व्हीप ९०४९५५५०७० या क्रमांकावरून पाठविण्यात आला होता. मात्र हा क्रमांक आपल्या नावाने नोंदणीकृत नसून आपला मित्र संतोष कदम यांच्या नावे आहे, असेही गोगावलेंनी मान्य केले. आम्ही सगळे गुहावटीला स्वत:च्या पैशांनी गेलो. कामाख्या देवीच्या दर्शनाला स्वत:च्या पैशाने जावे, असे वाटल्याने आमच्या तिकीटाचे पैसे आम्ही स्वत: भरले, असे गोगावले यांनी यावेळी सांगितले. शिवसेना पक्षात २०१३ ते २०१८ या काळात झालेल्या पक्षांतर्गत निवडणुका नियमानुसार झाल्या नव्हत्या, असे उत्तर उलटतपासणीत शिवसेनेचे (शिंदे गट) राहुल शेवाळकर यांनी दिले. मात्र २०१८मध्ये आदित्य ठाकरे यांची युवा सेना प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल खुद्द शेवाळे यांनीच ट्विट केले होते, असे निदर्शनास आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे. त्यामुळे शेवाळेंना त्यांचे ट्विट महागात पडणार की काय आणि यामुळे त्यांच्या साक्षीत विरोधाभास निर्माण होणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. सत्तांतराच्या घटनाक्रमादरम्यान २१ जून रोजी आपल्यावर हल्ला झाला होता, अशी माहिती यावेळी दिपक केसरकर यांनी दिली. ‘जेव्हा मी माझ्या कारकडे गेलो तेव्हा माझ्या कारवर हल्ला झाला आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांनी घेरले आणि कोणीतरी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी माझी कार जाऊ दिली. पण माझ्या मागे दोन गाड्या होत्या. त्या गाड्या माझ्या राहत्या घराजवळ पार्क केल्या होत्या. मी अनिल देसाई यांना फोन केला. त्यांना सांगितले की त्या गाड्या तिथून हटवा. मला सुरक्षित वाटत नाही आणि त्या गाड्या त्याच ठिकाणी राहिल्या तरी मला माझी काम पार पाडताना सुरक्षित वाटणार नाही. मी पत्रकार परिषद बोलावतो. त्यांना या घटनेबद्दल सांगतो असे मी देसाईंना सांगितले होते, अशी माहिती यावेळी केसरकरांनी दिली. या प्रकरणी बच्चू कडुंची साक्ष नोंदविली जाणार होती. मात्र काही कारणांस्तव ते हजर राहू न शकल्याने त्यांची साक्ष नोंदविण्यातच आली नाही. मंगळवारी साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. आता १८ ते २० डिसेंबर दरम्यान दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद होणे अपेक्षित आहे. दोन्ही पक्षांकडून लेखी व तोंडी दोन्ही स्वरुपात युक्तिवाद होणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KJfD9lE
No comments:
Post a Comment