म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सरकारने आदेश देऊनही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ नाशिकसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि. ५) एक दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे.राज्यातील ६०० तहसीलदार आणि २,२०० नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी होत आहेत. हे आंदोलक एक दिवसीय सामुहिक रजा घेणार असल्याने दाखले वितरणासह अन्य महसुली कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा राजपत्रित अधिकारी संघटनेने दिला आहे.‘ग्रेड पे’ची अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांनीही दिले आहेत. तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सोमवारी (दि.४) अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन दिले. या निवेदनानुसार, ३ मार्चपासून राज्यभरातील तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसीलदार संघटनेची मागणी मान्य करून राजपत्रित वर्ग २ यांचे ‘ग्रेड पे’ ४,८०० रुपये वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. परंतु अपर मुख्य सचिवांनी अद्याप अंमलबजावणी केली नसल्याचा दावा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे.तहसीलदार, नायब तहसीलदारांवर वेळोवेळी अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जातात. परंतु पगारवाढीच्या वेळी मात्र चालढकल केली जाते. त्यामुळेच कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे, अमोल निकम, कैलास पवार, सिनिता पाटील, नितीन पाटील, डॉ. व्ही. एन. तुप्ते, डॉ. अमित पवार, प्रज्ञा कुलकर्णी, अनिल चव्हाण आदींनी केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nEbaYKd
No comments:
Post a Comment