कोल्हापूर: गेल्या महिन्याभराच्या हाय व्होल्टेज प्रचारानंतर काल दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्रीची पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि सर्वाधिक सभासद असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत चुरशीने मतदान पार पडले असून ५६ उमेदवारांचे भवितव्य मत पेट्यांमध्ये बंद झाले आहे. दरम्यान उद्या सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापुरातील मुस्कान लॉन येथे मत मोजणीला सुरुवात होणार असून दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन राष्ट्रीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, गोकुळ चेअरमन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.९ टक्क्यांनी मतदानात वाढ; वाढलेल्या मतदानाचा कोणत्या गटाला फायदा होणार?आरोप प्रत्यारोपांच्या फेरी आणि लोकसभा आणि विधानसभेला मदत करण्याच्या शब्दावरून तयार करण्यात आलेले पॅनल आणि यातून सत्तारूढ महालक्ष्मी आघाडीने सत्ता राखण्यासाठी तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीने परिवर्तनासाठी कसलेली कंबर त्यामुळे राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यात दोन्ही आघाडीतील नेत्यांनी गाव न गाव पिंजून प्रचार केला. ज्या पद्धतीने नेत्यांमध्ये एकमेकांच्यावर ईर्षेने टीका झाली त्याच पद्धतीने मतदान देखील पार पडले. काल बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल ८९.०३ टक्के मतदान झाले असून एकूण ५६ हजार ९१ पैकी ४९ हजार ९४० मतदारांनी हक्क बजावला. राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील १७४ मतदान केंद्रावर मतदारांची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे ५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले असून अनेक प्रतिष्ठित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान मागच्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला असून २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ८२ टक्के मतदान झाले होते. मात्र यंदा तब्बल ९ टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याने याचा नेमका कोणत्या गटाला फायदा होणार याची उत्सुकता लागली आहे.सत्ताधारी आणि विरोधक दोघांमध्ये काटे की टक्करदरम्यान ही उत्सुकता आता काही काळच राहणार असून या ५६ उमेदवारांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे. कोल्हापुरातील मुस्कान लॉन येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत बिद्री ची सत्ता कोणाच्या हातात हे स्पष्ट होणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजितसिंह घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे, भाजपचे नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीमध्ये टक्कर होत आहे. मतदान आणि मतमोजणी आधीच नेत्यांना आत्मविश्वासदरम्यान कार्यक्षेत्रात आढावा घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या नुसार कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील हेच भारी ठरतील असे चित्र दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांवर परिवर्तन आघाडीचे उमेदवार भारी ठरतील असे चिन्ह दिसत आहेत. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत मतदानाआधीच सत्ताधारी आणि विरोधक आघाडीच्या गटातील नेत्यांना प्रचंड आत्मविश्वास आला असून सत्ताधारी गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक आम्ही जिंकलेलो आहे. मतदान आणि मतमोजणी ही केवळ औपचारिकता आहे असे म्हणाले होते. तर याला विरोधी गटाचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी घोडे मैदान फार दूर नाही. लवकरच चित्र स्पष्ट होईल असे प्रत्युत्तर दिले होते. यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणी दरम्यान बिद्रीचा गुलाल कोणाला लागणार याची उत्सुकता सभासदांना लागून राहिले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bk3cOvd
No comments:
Post a Comment