Breaking

Sunday, February 11, 2024

नऊ कोटींचा "विश्वासघात", 'असा' घातला बँक रिलेशन मॅनेजरने गंडा https://ift.tt/ZhedlrM

मुंबई: दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरातील एका वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याला बँकेच्या रिलेशन मॅनेजरने दगा दिला. वृद्ध दाम्पत्याने मुलाप्रमाणे या मॅनेजरवर विश्वास ठेवला आणि त्याचाच गैरफायदा घेत त्याने तब्बल नऊ कोटी ४० लाखांवर डल्ला मारला. बँक व्यवहार सांभाळणाऱ्या या मॅनेजरने खोट्या स्टेटमेंट दाखवत वृद्ध दाम्पत्याची दिशाभूल केली. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून मॅनेजरला अटक केली आहे. पेडर रोड रोडच्या उच्चभ्रू परिसरात ८४ वर्षीय सुखदेव (बदललेले नाव) आणि त्यांची पत्नी वास्तव्यास आहेत. सुखदेव हे मोठे कापड व्यावसायिक होते. त्यांनी या व्यवसायातून कोट्यवधींची गुंतवणूक करून ठेवली होती. तिन्ही मुलींची लग्न झाल्यामुळे त्यांचा सांभाळ करण्यासाठी केअरटेकर ठेवण्यात आले होते. दैनंदिन व्यवहारासाठी त्यांना बँकेत जाणे शक्य नसल्याने, तसेच बँक खात्यामध्येही कोट्यवधी रुपये जमा असल्याने बँकेने त्यांचे व्यवहार पाहण्यासाठी रिलेशन मॅनेजर म्हणून रवी शर्मा यांची नियुक्ती केली होती. शर्मा हाच सुखदेव यांच्या बँक खात्याचे दैनंदिन व्यवहार पाहायचा. पैसे काढणे, भरणे तसेच वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतविणे हे सर्व काही शर्मा हाच करायचा. रिलेशन मॅनेजर म्हणून २०१९ पासून शर्मा संपर्कात असल्याने सुखदेव आणि त्याच्या पत्नीनेही विश्वास टाकला होता. जानेवारी महिन्यात सुखदेव आणि त्यांच्या पत्नीची तब्येत खालावल्याने एक मुलगी त्यांच्या घरी आल्याने. दोघांची औषधे आणायची असल्याने तिने वडिलांचे डेबिट कार्ड सोबत घेतले. पैसे काढायचा प्रयत्न करीत असताना तोच अनेकदा अयशस्वी झाल्याने तिने शर्मा याला संपर्क केला. त्याने पैसे काढण्याची मर्यादा वाढविण्याची गरज असल्याचे सांगत काही रक्कम जमा केली. मात्र ही रक्कम काढल्यानंतर खात्यामध्ये केवळ दोनशे रुपये शिल्लक असल्याचे दिसले. मुलीला याबाबत संशय आल्याने तिने बँक गाठली आणि पाच वर्षांची स्टेटमेंट घेतली. त्यामध्ये आई-वडिलांबरोबरच तिन्ही मुलींच्या बँक खात्यावर केवळ दोनशे ते सातशे रुपये जमा असल्याचे दिसून आले. सुमारे दहा कोटींची रक्कम जमा असता केवळ इतकीच रक्कम शिल्लक असल्याचे पाहून धक्का बसला. सुखदेव यांच्या मुलीने बँक मॅनेजरची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणली. त्यांनी विभागीय चौकशी केली असता रवी शर्मा याने वेगवेगळ्या योजनांमध्ये, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सुखदेव यांच्या चेकवर सह्या घेतल्या. गुंतवणुकीच्या रकमेवर फायदा होत असल्याचे भासवून ही रक्कम साथीदार ध्वनिक भट आणि इतर साथीदारांच्या खात्यावर वळविली. चोरी पकडली जाण्याआधीच शर्मा याने बँकेतील नोकरी सोडून पळ काढला. सुखदेव यांच्या मुलीने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करीत शर्मा याला ग्रॅण्ट रोड येथून अटक केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4yxZCdN

No comments:

Post a Comment