अहमदनगर : अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा मतदारसंघाचे नाव अहमदनगरच राहणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी स्पष्ट केले. नामांतराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने जुनेच नाव वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने अहमदनगरच्या नामांराचा निर्णय तातडीने घेतला. त्यासाठी महापालिकेकडून ठरावही करून घेण्यात आला. निवडणुकीत राजकीय फायदा उठविण्यासाठी हा निर्णय होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने निवडणुकीत मात्र नवे नाव वापरता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कालपासून लागू झाली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलाविली होती. या बैठकीला भाजपा वगळता जिल्ह्यातील सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांनी शहराचे नामांतर झाल्याकडे लक्ष वेधून लोकसभा मतदारसंघाचे नाव काय असेल, यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना कोळेकर यांनी सध्या तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने अहमदनगर हेच नाव वापरले जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. या बैठकीत राजू भगत, ज्ञानदेव वाफारे, राजू आघाव या पक्ष प्रतिनिधींही चर्चेत भाग घेतला.अहमदनगरपूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आलेले आहे. मात्र, तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनीही लोकसभा मतदारसंघासाठी त्या शहरांची जुनीच नावे वापरण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने प्रक्रिया पूर्ण केली असली तरी आणखी काही गोष्टी प्रलंबित असल्याने तेथे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आता अहमदनगरच्या बाबतीतही तसेच झाले आहे. त्यामुळे या शहरांची नावे बदलल्याचा मुद्दा राजकीय पक्षांच्या प्रचारात येणार असला तरी निवडणूक आयोगाच्या लेखी मात्र जुनीच नावे राहणार आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hQCgjWU
No comments:
Post a Comment