चंद्रपूर: यवतमाळ जिल्हातील आर्णी येथे सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली होती. या सभेत प्रतिभा धानोरकर यांच्यावर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. मुनगंटीवार म्हणाले की, मी जे केलं आहे ते त्यांच्या दहा पिढ्याही करू शकत नाही. त्यांचे शिक्षण किती, माझे किती, त्यांचा अनुभव किती अनं माझा किती. यावेळेस मी काही बोलणार नाही. पुढच्या सभेत इशारा देईन. पण त्यानंतर बोलायला लागलो तर खैर नाही. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा धानोरकर यांनी आज चांगलाच समाचार घेतला. एखादी मुलगी बघायला जात असताना अख्य कुटुंब जातं. पण लग्न करून तीच मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलत असते. कदाचित पालकमंत्र्यांना याचा विसर झाला असावा, अशा शब्दात धानोरकरांनी मुनगंटीवारांचा समाचार घेतला आहे. ज्या सक्षमतेने बाप घर चालवतो तेवढ्याच खंबीरपणे बाई घर चालवत असते. आपल्या सर्वांची साथ मिळाली त्यामुळे माझे पती जिंकले. आता तीच साथ मला हवी आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.महाविकास आघाडीचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांची भेट घेण्याचा धडाका लावला आहे. आज राजुरा येथील कार्यकर्ता बैठक मेळावा आटपून कोठारी येथील मेळाव्यात त्या हजर झाल्या. आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, राजेंद्र वैध, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ( शरद पवार गट ), डॉ. अभिलाषा गावतूरे, घनश्याम मुलचंदानी, नम्रता ठेमस्कर, बेबीताई उयके, गोविंदा उपरे, नागेश गांजेलवार, संतोष इटनकर, सुरेश चहारे उपस्थित होते. मुनगंटीवार घाबरले आहेत. त्यामुळे ते बाईपणावर टीका करत सुटले आहेत. मतदार संघातील माझ्या आई, बहिणी त्यांना कदापि माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या. भाजपात गेलेले कलंकीत निष्कलंकीत होतात, असा इतिहास आहे. ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला ते त्यांचासाठी गंगेत अंघोळ केलेले ठरले. मात्र ज्यांनी भाजपचा विरोध केला ते गोदावरीत अंघोळ केलेले ठरले, अशा शब्दात आमदार सुभाष धोटे यांनी भाजपचा समाचार घेतला. प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान धोटे यांनी केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Fm7URiq
No comments:
Post a Comment