म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: होळीचा मुहूर्त साधून भाजपने रविवारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील सोलापूर, भंडारा-गोंदिया आणि चिमूर या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीतील भाजपच्या जागांचा आकडा आता २३वर पोहोचला आहे. याशिवाय महादेव जानकर महायुतीमध्ये आले असून, मनसेचाही समावेश होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पक्षासाठी पुरेशा जागा मिळविणे अधिक कठीण होत चालल्याचे दिसते.भाजपने पाचव्या यादीत भंडारा-गोंदिया येथून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा-गोंदियावर दावा केला होता. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादीचा दावा फेटाळून लावला. गडचिरोली-चिमूरमधून विद्यमान खासदार अशोक नेते यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. सोलापूरमधून विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे तिकीट कापून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना संधी दिली आहे. काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात दोन विद्यमान आमदारांमध्ये लोकसभेची लढाई होणार आहे.उत्तर मध्य मुंबई वगळता भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. भाजपने उत्तर पश्चिम मुंबई, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि सातारा लोकसभेची जागा लढविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे भाजप २८पेक्षा जास्त जागा लढणार हे निश्चित झाले आहे. माजी मंत्री महादेव जानकर महायुतीत सहभागी झाले आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीतील समावेश निश्चित मानला जात आहे. मनसेलाही लोकसभेच्या एक ते दोन जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'राष्ट्रवादी'ला अपेक्षेपेक्षा कमी जागा येण्याची शक्यता आहे.
साताऱ्यातील उमेदवारीचे गूढ
भाजपने अद्याप उत्तर मध्य, सातारा, अमरावती आदी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारी जाहीर केलेली नाही. अमरावतीसाठी नवनीत राणा यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले, तरी उत्तर मध्य मुंबई आणि सातारा मतदारसंघांविषयीचे गूढ कायम आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन प्रतिनिधित्व करीत असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारीला विलंब होत असल्याने पूनम महाजन यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. येथून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून उदयनराजे भोसले गेले तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे येथील उमेदवारांची प्रतीक्षा आहे.महादेव जानकर महायुतीत
लोकसभेच्या दोन जागांची मागणी करून महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाशी वाटाघाटी करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर पुन्हा महायुतीच्या मांडवात आले आहेत. जानकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री , अजित पवार यांची गळाभेट घेऊन महायुतीत सोबत राहणार असल्याचे घोषित केले. या संदर्भात महायुतीच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात जानकर यांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि जानकर यांच्या सह्या आहेत. जानकर यांना परभणीची जागा दिली जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, जानकर यांच्यासाठी महायुती विशेषतः भाजप धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kU4WFip
No comments:
Post a Comment