शांघाय : भारतीय पुरुष संघाने तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेतील १४ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. धीरज बोम्मदेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव या भारतीय रिकर्व्ह संघाने ऑलिम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाचा रविवारी पराभव केला आणि सुवर्णयश मिळवले. धीरज, तरुणदीप आणि प्रवीणने निर्णायक लढतीत कमालीच्या शांतपणे लक्ष्यवेध करताना एकही सेट गमावला नाही. भारताने यापूर्वी २०१०च्या शांघाय वर्ल्ड कप स्पर्धेत बाजी मारली होती. त्या वेळी तरुणदीपच्या साथीला राहुल बॅनर्जी आणि जयंत तालुकदार होते. या वेळी ४० वर्षीय तरुणदीपने आपला अनुभव निर्णायक ठरवला. त्यामुळे भारताने अव्वल मानांकित दक्षिण कोरियास ५-१ (५७-५७, ५७-५५,, ५५-५३) असे पराभूत केले. भारतीय महिला संघाने २०१३ मधील मेडेलिन (जुलै) आणि व्रॉक्ला (ऑगस्ट) येथे दक्षिण कोरियास हरवले होते. त्यानंतर प्रथमच भारतीय रिकर्व्ह संघाने दक्षिण कोरियाला हरवले आहे.धीरज-अंकिता भकत यापूर्वी मिश्र दुहेरीच्या ब्राँझपदकाच्या लढतीत पराभूत झाले होते, तर दीपिकाकुमारीला महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्याची भरपाई भारतीय पुरुष संघाने केली. भारतीय संघाने या स्पर्धेत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्राँझ जिंकले होते. भारताच्या या यशात ज्योती सुरेखाच्या तीन सुवर्णपदकाचा मोलाचा वाटा आहे.दक्षिण कोरियाच्या संघात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या संघातील किम वूजिन आणि किम जे देओक यांचा समावेश होता. भारतीयांनी याचे कोणतेही दडपण घेतले नाही. पहिल्या सेटमध्ये तीनदा दहा गुणांचा वेध घेऊन भारताने कोरियाला रोखले. भारतीयांच्या या अचूकतेचे कोरियावर दडपण आले. त्यांच्याकडून दुसऱ्या सेटमध्ये दोनदा आठ गुणांचाच वेध घेतला गेला. त्याच वेळी भारतीयांनी चारदा दहा गुण मिळवले. त्यामुळे भारताने दुसरा सेट दोन गुणांच्या फरकाने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये कोरियाला ५३ गुणच मिळवता आले.ऑलिम्पिक पात्रतेची आशाभारतास आत्तापर्यंत तिरंदाजीतील पॅरिस ऑलिम्पिकसाठीची एकच पात्रता साध्य झाली आहे. ही कामगिरी धीरज बोम्मदेवरा याने केली आहे. अखेरची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा १८ ते २३ जून दरम्यान आहे. त्यानंतर जागतिक सांघिक क्रमवारीनुसार सांघिक स्पर्धेसाठी; तसेच पात्र संघातील तिरंदाजांना वैयक्तिक स्पर्धेसाठी प्रवेश मिळेल. पात्रता साध्य न होणाऱ्या संघांनाच यानुसार प्रवेश मिळतो. जागतिक सांघिक क्रमवारीत भारतीय पुरुष संघ तिसरा आहे. 'दक्षिण कोरियाविरुद्ध खेळताना कायम दडपण असते. त्यामुळे हा विजय मोलाचा आहे. त्याचबरोबर आता कोणीही भारताच्या क्षमतेविषयी शंका घेऊ शकणार नाही. भारतीय संघाने हाच जोष पॅरिसपर्यंत राखणे आवश्यक आहे,' असे भारताचे माजी तिरंदाज राहुल बॅनर्जी यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aGNWFwq
No comments:
Post a Comment