अमुलकुमार जैन, रायगड: अलिबाग तालुक्यातील बुरुमखान आदिवासीवाडी येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय संतोष वाघमारे (२६) असं मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तक्रार अर्चना अजय वाघमारे (२४) हीने अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. यातील आरोपी राहुल उदय वाघमारे यास अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वरसोली ग्राम पंचायत हद्दीतील बुरूमखान आदिवासी वाडी येथे संतोष बाळू वाघमारे आणि राहुल उदय वाघमारे यांच्यामध्ये जुन्या वादावरून २२ एप्रिलला आठ वाजण्याच्या सुमारास भांडण झाले. संतोष वाघमारे यांचा मुलगा मयत अजय संतोष वाघमारे हा भांडण सोडवण्यासाठी गेला. तेव्हा राहुल वाघमारेने दोन्ही हाताने त्याचा गळा पकडून त्याला खाली पाडले. त्याच्या छातीवर बसून पुन्हा गळा दाबला. तसेच गुडघ्याने छातीवर आणि पोटावर मारहाण केली. अजय वाघमारे जागीच बेशुद्ध पडला. त्याला त्याची पत्नी अर्चना अजय वाघमारे आणि इतर लोकांनी औषध उपचार करता जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले. यातील आरोपी राहुल हा जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. त्याला आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात याबाबत १०८/२०२४, भा.द.वी. ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/teADbiR
No comments:
Post a Comment